मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी गुरूवारी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. कोरोनाचा जोर ओसरताच मुख्यमंत्र्यांना विविध ठिकाणच्या दौऱ्यांना सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे.
यावेळी राज्य सरकारच्या (maharashtra government) नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.
- खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.
- या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.
- या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.
- या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
- या प्रकल्पांतर्गत पॅकेज १ करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
- या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
- पॅकेज १ व पॅकेज २ चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.
- या प्रकल्पाची एकूण किंमत रु.६६९५.३७ कोटी इतकी आहे.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. (maharashtra cm uddhav thackeray visited mumbai pune expressway missing link project site)