Advertisement

सीरममधील लस सुरक्षित, आगीच्या घटनेची चौकशी करणार- उद्धव ठाकरे

सीरममधील कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सीरममधील लस सुरक्षित, आगीच्या घटनेची चौकशी करणार- उद्धव ठाकरे
SHARES

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटमधील एका इमारतीला आग लागल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. परंतु या आगीत सीरममध्ये तयार होत असलेल्या कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका बसलेला नाही. येथील कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं.

सीरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार २२ जानेवारी २०२१ रोजी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसंच सीरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला. 

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सीरमचे सीईओ अदर पूनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा- सीरम इनस्टिट्यूट आग : मृत कामगारांच्या कुटुंबियांना २५ लाख

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जगातील कोविडचं (coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. गेल्या आठवड्यात सीरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झालेला असतानाच लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागल्याची बातमी आली. दुर्दैवाने या दुर्घटनेत ५ कामगार मृत्युमुखी पडले. आगीचं वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. 

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथं नवं केंद्र सुरू केलं जाणार होतं, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र लस बनवली जाते ते केंद्र आणि लशीचा साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सीरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सीरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना (covid19) लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम पडणार नाही. बीसीजी आणि इतर लसीचं नुकसान झालं आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

(maharashtra cm uddhav thackeray visits serum institute pune)

हेही वाचा- त्यांच्याकडे ही माहिती येते कशी? सीरमच्या आगीवरून मुख्यमंत्री संतापले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा