Advertisement

महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावरच?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

सध्या काँग्रेसच्या सर्वच नेत्यांकडून आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला जातोय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तर आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न रंगवायला लागले आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावरच?, बाळासाहेब थोरात म्हणाले…
SHARES

सध्या काँग्रेसच्या सर्वच नेत्यांकडून आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला जातोय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तर आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न रंगवायला लागले आहेत. काँग्रेसच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टोले हाणले जात असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी काल (१७ जून) बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. कारण विधानसभा निवडणुकीला अजून साडे तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. जिथं जिथं काँग्रेसचे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत, तिथच्या परिरात फिरून पक्ष मजबूत केला पाहिजे, असं मत सर्वांनीच व्यक्त केलं. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्ष समोर ठेवून काम करण्याच्या सूचना देखील सर्वांना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- काँग्रेसचा पुन्हा महागाईविरोधात एल्गार, करणार राज्यभर आंदोलन

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करत सरकार बनवलं. जनतेसाठी काम करणं हेच या सरकारचं मुख्य उद्दिष्ट्य आहे. गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे, हा सरकारचा हेतू आहे. वेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांचं हे सरकार असल्यामुळे समन्वयात येणाऱ्या अडचणींवर मात करत, निर्माण होणारे प्रश्न सोडवत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) म्हणाले. 

प्रभारींसोबतच्या बैठकीत सरकारमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री, संपर्कमंत्र्यांनी कामाची व्याप्ती वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या विधानसभा अध्यक्षांचं पद केव्हा भरण्यात येईल, असा प्रश्न विचारल्यावर विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होईल. अध्यक्ष कोण होईल, याबाबतच नाव तेव्हा निश्चित केलं जाईल, अशी माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली.

(maharashtra congress focusing to create a strong network with voters and party workers ahead of election says balasaheb thorat)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा