Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन, लिलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन, लिलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
SHARES

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या ६ महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज शुक्रवारी अयशस्वी ठरली.  त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.    

पतंगराव यांचे पार्थिव शनिवारी १० मार्च रोजी सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान पुण्यातील निवासस्थानी आणि त्यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सोनहीरा साखर कारखाना, वांगी, सांगली इथे सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गेल्या काही दिवसांपासून पतंगराव यांच्यावर  लिलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. किडनीच्या विकाराने त्रस्त कदम यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कदम यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून होती. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली होती. गेल्या २३ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अधिक उपचारासाठी त्यांना अमेरिकेत हलवले जाणार, असेही सांगितले जात होते. मात्र, पतंगरावांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.  

परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले पतंगराव कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या  पतंगरावांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये महसूल, उद्योग, सहकार, वने, पुनर्वसन व मदत, शिक्षण या खात्यांचा समावेश आहे. 

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे अनेकदा नाव आले. तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची राज्यात छाप होती. आताच्या पलूस-कडेगाव (पूर्वीचा भिलवडी-वांगी) मतदारसंघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले. राज्याच्याच नव्हे तर देशातील राजकारणातही त्यांचा तितकाच दबदबा होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तळागाळातून आलेला संवेदनशील मनाचा नेता गमावल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा