Advertisement

केरळला महाराष्ट्राकडून २० कोटींची मदत


केरळला महाराष्ट्राकडून २० कोटींची मदत
SHARES

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारही पुढं आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून या आर्थिक मदतीची माहिती दिली. सरकारबरोबरच 'महाराष्ट्र चेंबर्स आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीज' अर्थात एमसीएचआय-क्रेडायनंही केरळमधील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.


इथंही करता येईल तुम्हाला मदत


मोठं नुकसान

केरळमधील पूरस्थितीचा हवाई आढावा शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी केरळसाठी ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली. केरळमध्ये आतापर्यंत ८००० कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं असून ३२४ जणांचा जीव गेला आहे. अजूनही पूरस्थिती नियंत्रणात आली नसून राज्यात रेड अलर्ट जारी आहे.



निधी जमा

या परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला मदतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत केरळला २० कोटींची मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'केरळा फ्लड रिलीफ फंड'मध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. तर काँग्रेसच्या आमदारांनी आपला एका महिन्याचा पगार या निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.


दीड कोटी, १० टन अन्नसाठा

सामान्य मुंबईकरही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. बांधकाम क्षेत्रातील संस्था एमसीएसआय-क्रेडायनं केरळ फ्लड रिलीफ फंडला दीड कोटी रुपयांची मदत दिली असून सोबत १० टन्नसाठा केरळला पाठवण्यात येणार आहे. यांत हल्दीराम चिवडा, लाडू, बिस्कीट यासह अन्य खाद्यपदार्थांचा समावेश असेल. हा अन्नसाठा रविवारी सैन्याच्या विशेष विमानानं तसंच जहाजानं केरळला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमसीएचआय-क्रेडायच्या प्रवक्त्यांनं 'मुंबई लाइव्ह'ला दिली.



'सीपीएम'चं मुंबईत मदतकेंद्र

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मदतकेंद्र उभारली आहेत. या मदतकेंद्रात मिनिरल वाॅटर, तांदूळ, तूरडाळ, बिस्किट, सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषध जमा केली जात आहेत. वाशीतील केरळा हाऊस, चेंबूरमधील आदर्श विद्यालय, वसईतील बीकेएस स्कूल यासह अन्य ठिकाणी ही मदतकेंद्र असून नागरिकांनी मदतीसाठी पुढं यावं, असं आवाहन सीपीएमकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

केरळच्या पूरग्रस्तांना मुंबईकरांचा मदतीचा हात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा