Advertisement

अर्थसंकल्पात काय हवंय? तुम्हीही करा सूचना


अर्थसंकल्पात काय हवंय? तुम्हीही करा सूचना
SHARES

सामान्य माणसाला सरकारच्या दैनंदिन व्यवहारात सामील करुन घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने येत्या अर्थसंकल्पासाठी सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. विविध धोरणं ठरविताना नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळविण्यासाठी शासनामार्फत नागरिक, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्तींकडून वेळोवेळी सूचना मागविण्यात येतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच नागरिकांच्या उचित सूचना-अपेक्षांचा समावेश करण्यात येणार आहे.


प्रक्रिया एकतर्फी असू नये

राज्यासाठी सकारात्मक अर्थसंकल्प तयार करणं ही केवळ एकतर्फी प्रक्रिया असू नये, यात नागरिकांचाही समावेश असावा याच उद्देशाने ही पद्धत सुरू केली. तसेच राज्याचा अर्थसंकल्प अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, यासाठी या सूचना देण्याचे आवाहन केलं आहे, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शासनाच्या योजनांसह प्रशासकीय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख व विकासाभिमुख करतानाच धोरण निर्मितीत राज्‍याच्‍या महसुली उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ करणे, खर्चाची बचत करणे यासह अस्तित्त्वात असलेल्या योजना, यंत्रणा, प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना सूचना करता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे नवीन योजना, यंत्रणा आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठी देखील आपले अभिप्राय देता येतील, असं देखील मुख्यमंत्री कार्यालयाने कळवलं आहे.


येथे पाठवा सूचना

शासनाच्या ध्येय-धोरणांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असावा, या भूमिकेतून आगामी २०१८ - १९ च्या अर्थसंकल्पाविषयी नागरिकांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्‍या सूचना पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा