Advertisement

शरजील उस्मानीवर कठोर कलमं का नाहीत? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

हिंदूविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याच्याविरोधात कडक कलम लावण्याऐवजी ठाकरे सरकार त्याला जामीन मिळवण्यासाठी मदत करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरजील उस्मानीवर कठोर कलमं का नाहीत? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
SHARES

पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत हिंदूविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याच्याविरोधात कडक कलम लावण्याऐवजी ठाकरे सरकार त्याला जामीन मिळवण्यासाठी मदत करत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार? असा प्रश्नही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले होते की, ‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तरी त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’, प्रत्यक्षात काय, तर तो पुणे पोलिसांकडे येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केलं? 

मूळ तक्रारीत भादंविचं २९५ अ कलम समाविष्ट असतानासुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावलं जाणारं हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळलं गेलं. लावलं ते कलम १५३ अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागतं.

हेही वाचा- शरजील कुठेही असला, तरी त्याला अटक करू- अनिल देशमुख

खरं तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवं होतं. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विचारला आहे.

पुण्यात ३० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी (sharjeel usmani) याने हिंदुत्वाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवण्यात आला. 

या वादग्रस्त भाषणाची व्हिडिओ क्लिप तपासून राज्याच्या गृहविभागाने शरजील विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. मात्र गुन्ह्याची नोंद होऊनही शरजीलला अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारण्यात येऊ लागला.

(maharashtra government soft approach against sharjeel usmani says devendra fadnavis)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा