Advertisement

तृतीयपंथीयांनाही मिळणार रोजगार, लवकरच कल्याण महामंडळाची स्थापना


तृतीयपंथीयांनाही मिळणार रोजगार, लवकरच कल्याण महामंडळाची स्थापना
SHARES

स्त्री-पुरूषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येतं. त्याच पद्धतीने तृतीयपंथीयांनाही जगता यावं, त्यांनाही मेहनतीची कमाई करता यावी या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी केली.

राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने तृतीयपंथी समितीच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कांबळे यांची भेट घेतली.


अंमलबजावणी नाही

इतर सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी राज्य सरकारने २०१४ साली कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच २०१७-१८ सालच्या या अर्थसंकल्पात या मंडळासाठी ५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही महिला व बालविकास विभागाकडून त्याची अंमलबजावणी न झाल्याची माहिती लक्ष्मी त्रिपाठी यांनी दिली. हे महामंडळ स्थापन झाल्यावर पुढील आराखडा तयार करून कार्यक्रम हाती घेण्यात येतील. त्यामुळे महामंडळाची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.



आमच्या महामंडळाचा प्रस्ताव गेली ३ वर्षे महिला व बालविकास विभागाकडे पडून होता. त्या दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदने देऊनही महामंडळाची स्थापना झाली नाही. आता तरी समाज कल्याण विभागाकडून तो १५ दिवसांत स्थापन होईल, अशी अपेक्षा आहे.

- लक्ष्मी त्रिपाठी, सामाजिक कार्यकर्त्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा