Advertisement

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात?

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे पाहता ठरवलेल्या तारखेचा अधिवेशन घेणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नेमकं केव्हा घ्यावं? यावर पुन्हा एकदा बैठक होणं अपेक्षित आहे.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात?
SHARES

एरवी जून महिन्यात घेण्यात येणारं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन कोरोना संकटामुळे पुढं ढकलून ३ आॅगस्ट रोजी घेण्याचं ठरवण्यात आलं होतं. परंतु कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे पाहता ठरवलेल्या तारखेचा अधिवेशन घेणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नेमकं केव्हा घ्यावं? यावर पुन्हा एकदा बैठक होणं अपेक्षित असून बहुधा शेवटच्या आठवड्यात हे अधिवशेन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (maharashtra legislative assembly monsoon session might postpone once again)

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्यात येईल, असे संकेत दिले. ते म्हणाले की, नियमानुसार २ अधिवेशनामध्ये ६ महिन्याचं अंतर असलं पाहिजे. विधीमंडळाचं मागील अधिवेशन मार्च महिन्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे नियमानुसार पुढील अधिवेशन सप्टेंबरपर्यंत घेता येऊ शकतं. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टला घेण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला होता. परंतु कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पावसाळी अधिवेशन केव्हा घेता येईल, यावर चर्चा करण्यासाठी येत्या मंगळवारी बैठक होणं अपेक्षित आहे. या बैठकीतच पावसाळी अधिवेशन घेण्यासंदर्भात निर्णय होईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन होऊ शकतं, असा अंदाज नाना पटोले यांनी वर्तवला.

हेही वाचा - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

सुरूवातीला २२ जूनपासून पावसाळी अधिवेशन घेण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू होता. परंतु राज्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता २२ जूनपासून अधिवेशन घेणं कठीण होतं. अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांचं मर्यादीत असावं, असंही काहींचं म्हणणं होतं. त्यानुसार बुधवार १० जून २०२० रोजी  विधान भवनाच्या हिरवळीवर विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय ३ आॅगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन घेण्यावर एकमतही झालं होतं. हे अधिवेशन १५ दिवसांचं होईल असं ठरवण्यात आलं होतं.

सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट अधिकच गहिरं होत चाललेलं आहे. राज्यात ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण झाले असून एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. त्यातही सत्ताधारी महाविकास आघाडीतील तब्बल ५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने सरकारच्या चिंतेत भर पडलेली आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा