Advertisement

सत्तेबाहेरचा काळ माणसं ओळखायला शिकवणारा - सुनील तटकरे


SHARES

सत्तेची रसाळ गोमटी फळे खाल्यानंतर विरोधी पक्षांत बसणं त्रासदायक असतं, याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. 1999 ते 2014 असा दीड दशकांचा काळ राज्यात सत्ताधारी म्हणून वावरणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांमध्ये बसावं लागतंय. हा आपल्यासाठी असमाधानाचा काळ आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मान्य केलं आहे. सुनील तटकरे यांनी 'मुंबई लाइव्ह' कार्यालयाला भेट दिली. मुंबई लाइव्हला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते अनेक विषयांवर भरभरून बोलले. सत्तेत नसल्याचा जसा तोटा असतो, तसाच फायदाही असतो. ज्येष्ठ नेत्यांच्या अंगावर मंत्रिपदाची झूल नसल्यामुळे पक्षकार्यासाठी अधिकाधिक वेळ देणं, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं शक्य होतं, या शब्दांत त्यांनी सत्तेत नसल्याचे फायदे पटवून  देण्याचा प्रयत्न केला. सत्तेबाहेर असल्याच्या काळात आपलं कोण आणि परकं कोण? हे कळतं, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

स्वतःसह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळ्यांच्या आरोपाबाबत बोलताना ही प्रकरणं न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. 

भारतीय जनता पार्टीशी आपला पक्ष जुळवून घेतो, हा आरोप खोडून काढताना भाजपा आणि शिवसेना यांच्यातले संबंध म्हणजे नौटंकी आहे, असा शेरासुद्धा तटकरे यांनी दिला. एकीकडे शिवसेना भाजपासोबत सत्तेत बसून सगळ्या सरकारी  सुविधा घेते आणि दुसरीकडे भाजपावर टीका करते, ही शिवसेनेची दुटप्पी भुमिका असल्याचे सांगत 'दुटप्पीपणाचा कळस म्हणजे शिवसेना' अशी बोचरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. कर्जमाफीच्या संदर्भात शिवसेनेने बँकांबाहेर 'ढोल बजाओ' आंदोलन केलं. ढोल बँकांबाहेर कसला बडवता? मंत्रालयासमोर बडवा असा टोलाही तटकरे यांनी शिवसेनेला लगावला. 


सुनील तटकरे यांची विशेष मुलाखत


पहारेकरी फक्त बघ्याच्या भूमिकेत

शिवसेना गेली 25 वर्षे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेत आहे. शिवसेना मुंबई महापालिकेचा कारभार हाताळण्यात सपशेल अपयशी ठरली. रस्त्याच्या कामांमध्ये, नालेसफाईमध्ये, घनकचऱ्याच्या कामात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेली शिवसेना मुंबईकरांच्या समस्या सोडवू शकलेली नाही, तर दुसरीकडे पहारेकऱ्याच्या भूमिकेत असलेली भाजपा बघ्याच्या भूमिकेत असल्याचे सांगत तटकरे यांनी भाजपावरही तोंडसुख घेतलं. 


मध्यावधीसाठी राष्ट्रवादी तयार


नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले. ग्रामीण भाषेत याला कपडे काढण्याचे काम केले असे म्हणतात. मात्र निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे शिवसेना सत्ता सोडेल असे वाटत नाही. जर  मध्यावधी निवडणुकीची वेळ आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी तयार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.



हेही वाचा - 

कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?

पाटील, तुम्हाला कवितेत रस हाय काय?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा