कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?

Mumbai
कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?
कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?
See all
मुंबई  -  

राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)चे उमेदवार रामनाथ कोविंद यांची अखेर राष्ट्रपती पदावर निवड झाली आहे. कोविंद राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत रामनाथ कोविंद यांना 7 लाख, 2 हजार, 644 म्हणजेच एकूण मतदानापैकी 65.65 टक्के मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडी(युपीए)च्या उमेदवार मीरा कुमार यांना 3 लाख, 67 हजार 314 म्हणजेच एकूण मतदानापैकी 34.35 टक्के एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची महाराष्ट्रातील सर्व मते कोविंद यांना मिळालीच. पण त्याव्यतिरिक्त विरोधी पक्षांची 22 मतेही कोविंद यांच्याच पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे. 


ते 22 फुटीर कोण?

राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं फुटण्याचा अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा अखेर खरा ठरला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची एकूण 22 मते फुटली आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 287 आमदारांनी मतदान केलं होतं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे परदेशात असल्याने ते मतदान करू शकले नव्हते. महाराष्ट्रातील 287 आमदारांच्या मतांपैकी 208 मते एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना, तर 77 मते युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्या पारड्यात पडली. तर महाराष्ट्रातील 2 मते बाद ठरली. रामनाथ कोविंद यांना 208 मते पडली, याचाच दुसरा अर्थ असा की, विरोधकांची एकूण 22 मते फुटली आहेत. कारण भाजपा, शिवसेना आणि घटकपक्षांची मिळून 186 मते होतात. मात्र, कोविंद यांना 208 मते पडली. म्हणजेच विरोधकांमधून 22 मते कोविंद यांना दिली. त्यामुळे ते 22 फुटीर कोण असा प्रश्न आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्यांना पडला आहे.

रवी राणा याचा दावा ठरला खरा -

अपक्ष आमदार रवी राणा यांनी याआधीच असा दावा केला होता की, राष्ट्रवादीचे 5 ते 6 आणि काँग्रेसचे 8 ते 9 आमदार कोविंद यांना मतदान करतील. ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे फुटलेली 22 मते पाहता आमदार रवी राणा यांचा दावा खरा ठरला असेच म्हणावे लागेल.
ही आयडॉलॉजिकल लढाई होती. कोविंद यांना 17-18 पक्षांचे समर्थन होते. आमचे संख्याबळ कमी होते तरी देखील आम्ही त्यांच्या विरोधात आमचा उमेदवार उभा केला. या फुटलेल्या मतांचा अभ्यास करून माहिती घेऊन बोलणेच योग्य राहील.
अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस

आमचे फक्त 1 मत फुटले. ज्या रमेश कदम यांचे मत फुटले त्यांना आम्ही आधीच पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यामुळे रमेश कदम यांचे मत सोडून राष्ट्रवादीची 40 मते मीरा कुमार यांना पडली.
सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

22 जण क्रॉस वोटींग करणार हे मी आधीच सांगितले होते. अपक्ष 5 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मिळून 14 आमदारांनी मतदान केले आहे. जरी राष्ट्रवादी सांगत असली तरी त्यांची 1 पेक्षा जास्त मते फुटली आहेत. त्यामुळे ज्यांनी कोविंद यांना मतदान केले त्यांचे माझ्याकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.
रवी राणा, अपक्ष आमदार


मुंबई भाजपा कार्यालयातही जल्लोष -

रामनाथ कोविंद यांच्या विजयाची घोषणा होताच मुंबईमध्ये देखील भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करत जनता आजही भाजपाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.


रामनाथ कोविंद यांच्या बद्दल थोडक्यात -

रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी झाला

कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण1977 ते 1979 मध्ये घेतल्यानंतर दिल्लीच्या हायकोर्टात वकिली केली

1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली.

त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम देखील पाहिलं

भाजपा दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

1977 मध्ये जनता पार्टीचं सरकार आले तेव्हा ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्विय सचिव होते. त्याचवेळी ते भाजपा नेतृत्त्वाच्या संपर्कात आले.
रामनाथ कोविंद यांनी 1990 मध्ये भाजपाच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

पक्षाने त्यांना 1993 आणि 1999 मध्ये उत्तर प्रदेशातून दोनवेळा राज्यसभेवर पाठवले होते.


हेही वाचा -

राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून क्रॉस व्होटिंग?

राष्ट्रपतिपदाची निवडणूकः भुजबळ रुग्णवाहिकेतून पोहोचले विधानभवनात


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.