राष्ट्रपतिपदाची निवडणूकः भुजबळ रुग्णवाहिकेतून पोहोचले विधानभवनात

Mumbai
राष्ट्रपतिपदाची निवडणूकः भुजबळ रुग्णवाहिकेतून पोहोचले विधानभवनात
राष्ट्रपतिपदाची निवडणूकः भुजबळ रुग्णवाहिकेतून पोहोचले विधानभवनात
See all
मुंबई  -  

देशाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडीसाठी मतदानाची  प्रक्रिया सोमवारी महाराष्ट्र विधिमंडळात झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या विधानसभेच्या 288 पैकी 287 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेले महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी भायखळा तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम या दोघांनाही मतदानाचा अधिकार बजावता यावा, म्हणून पीएमएलए कोर्टाने त्यांना एक तासासाठी तुरुंगाबाहेर नेण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे, रमेश कदम यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांना आपले मत दिले.  भुजबळांच्या स्वागताला...

एक आमदार म्हणून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क आपल्याला मिळावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी पीएमएलए न्यायालयाकडे केली होती. भुजबळ येवला मतदारसंघाचे आमदार आहेत. छगन भुजबळ मतदानाला आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी कोण उपस्थित राहणार? त्यांच्याशी संवाद साधणारे लोकप्रतिनिधी कोण असतील? याबाबत आधीपासूनच चर्चा सुरु होती. कधीकाळी महागड्या गाड्यांमधून प्रवास करणारे छगन भुजबळ याखेपेस विधानभवन परिसरात आले ते रुग्णवाहिकेतून. विधानभवनाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी विधानभवन इमारतीच्या पायऱ्यांपर्यंत भुजबळ यांची सोबत केली. तासाभरासाठी तुरुंगाबाहेर आलेल्या छगन भुजबळ यांनी मृत्यूआधी आपले निर्दोषत्व सिद्ध व्हायला हवे. त्याआधीच मरण आल्यास आपण दोषी आहोत असा जनतेचा समज होईल. त्यामुळे ईश्वराने निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत आपल्याला जिवंत ठेवावे, अशी भावोत्कट प्रतिक्रिया व्यक्त केली. 


आव्हाडांचे डोळे पाणावले

छगन भुजबळ मतदानासाठी विधानभवन परिसरात आल तेव्हा त्यांची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला गहिवरुन आले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भावना व्यक्त केली. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याची आताची अवस्था बघितल्यानंतर राजकारणात रहायचं की नाही, या संभ्रमात आपण असल्याचे आव्हाड यांनी बोलून दाखवले.  


रमेश कदम यांचे मत एनडीएला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्त पुरोगामी दल (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दिला आहे. मात्र पक्षाचे आमदार यांनी, आपण रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याची माहिती दिली.


विधान परिषद सदस्यांमध्ये उत्साह

घटनेप्रमाणे राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडण्याचा अधिकार विधान परिषद सदस्यांना नाही. मात्र मतदान प्रक्रिया सुरु असताना राज्याच्या विधान परिषद सदस्यांचा उतू चाललेला उत्साह पाहून हे जाणवत नव्हते. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर धनंजय मुंडे, हरिभाऊ राठोड, अनंत गाडगीळ आदींची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. 


क्षितीज ठाकुर मतदानाला अनुपस्थित 

मतदानाला गैरहजर असलेले एकमेव आमदार म्हणजे क्षितीज ठाकुर. बहुजन विकास आघाडीचे आमदार असलेले ठाकुर परदेशात असल्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.  Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.