Advertisement

कुणाच्या तरी अहंकारापोटी थांबलं मेट्रोचं काम, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कामावरून महाविकास आघाडी सरकारला टोला हाणला.

कुणाच्या तरी अहंकारापोटी थांबलं मेट्रोचं काम, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
SHARES

देशातील सर्वात वेगवान काम मुंबईत मेट्रोचं होत होतं. परंतु या कामाला आता खिळ बसली आहे. यामुळे मोठं आर्थिक नुकसान होत आहे, कुणाच्या तरी वैयक्तिक अहंकारासाठी विकासाच्या कामाचा असा खेळखंडोबा योग्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कामावरून महाविकास आघाडी सरकारला टोला हाणला. आपल्या कोल्हापूर दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. (maharashtra opposition leader devendra fadnavis slams maha vikas aghadi government over metro 3 aarey car shed project)

आरेत मेट्रो ३ साठी कारशेड उभारण्यावरू शिवसेना आणि तत्कालीन भाजप सरकारमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. सोबतच अवाढव्य खर्च असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही साईड ट्रॅकवर टाकलं. यातील बहुतांश प्रकल्प हे भाजप सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत.

त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ कुणाच्या तरी वैयक्तिक अहंकारासाठी विकासाच्या कामाचा असा खेळखंडोबा योग्य नाही. देशातील सर्वांत वेगवान काम मुंबईत मेट्रोचं होत होतं. त्याला खिळ बसली आहे. गेल्या ८ महिन्यांपासून काम बंद आहे. यामुळे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. काम थांबल्याने एका दिवसाला ४ ते ४.५ कोटी रूपये नुकसान होत आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत, यावर मला बोलायचं नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाही, यावर मी भाष्य करणार नाही. त्यांना जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील, तिथून घ्यावे. पण निर्णय व्हावे. प्रशासकीय रचनेत दौर्‍याचे एक महत्त्व असतं. त्यातून कामाला गती मिळते. ते दौरे का करीत नाही, यावर मला बोलायचं नाही, टीकाही करायची नाही. 

प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालते, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असतं. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

तसंच आपली लढाई ही मोदी सरकारशी नाही, हे त्यांना कुणीतरी लक्षात आणून द्यावं. आपल्याला कोरोनाशी लढायचं की घाबरायचं, हे त्यांना ठरवावं लागेल. केवळ स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचं काम सत्तेतील महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

हेही वाचा - दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा