Advertisement

सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडतंय - धनंजय मुंडे


सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडतंय - धनंजय मुंडे
SHARES

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आतापर्यंत मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरू होतं. पण राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागणीकडं लक्ष न दिल्यानं आरक्षणाचा प्रश्न चिघळल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. राज्य सरकार हा प्रश्न सोडवण्याएेवजी आंदोलकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळेस राज्य सरकारनं जी स्ट्रॅटर्जी वापरली, शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडत आंदोलन शांत केलं, तिच स्ट्रॅटर्जी सरकार मराठा आंदोलनाबाबतही वापरत आहे. आंदोलकांमध्ये फूट पाडत आंदोलन थंड करण्याचाच सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.



या अाहेत राष्ट्रवादीच्या मागण्या

मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीनं उचलून धरली असून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी पुढची दिशा काय असेल, हे ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह ३९ आमदार उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं, तसेच नोकरभरतीतही १६ टक्के आरक्षण द्यावं, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेत कोम्बिंग आॅपरेशन थांबवण्यासह धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित विषयाकडेही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

निवेदन राज्यपालांना देणार

बैठकीतील मागण्यासंबंधीचं निवेदन मागासवर्गीय आयोगासह राज्यपालांसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागासवर्गीय आयोगाची भेट घेत आपल्या मागण्याचं निवेदन दिलं. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची मागणी आयोगासमोर ठेवण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. मागासवर्गीय आयोगानंतर सोमवारी ५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही भेट घेणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.


सरकार बघ्याची भूमिका घेतंय - काँग्रेस

शिवसेना, राष्ट्रवादीसह सोमवारीही काँग्रेसनंही आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतंत्र बैठक घेतली. त्यानुसार आरक्षण लवकरात लवकर लागू करण्याची मागणी मागासवर्गीय आयोगासह राज्यपालांसमोर ठेवण्याचा निर्णय काँग्रेसनही घेतला आहे. आंदोलन हिंसक होत असून आंदोलक आत्महत्या करत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत अाहे. परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.


हेही वाचा -

मराठा मोर्चाचा 'क्रांतीदिनी' पुन्हा एल्गार!

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : अहवाल येताच विशेष अधिवेशन बोलवणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा