Advertisement

सूडाचं राजकारण!

कथित कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'ईडी'ने केलेल्या चौकशीमुळं सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.

सूडाचं राजकारण!
SHARES
Advertisement

कथित कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'ईडी'ने केलेल्या चौकशीमुळं सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. सत्ताधारी सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांना हाताशी धरून कशा पद्धतीने राजकीय सूड उगारतात यावर नाक्यानाक्यावर चर्चा रंगंलीय. याआधीही वेगवेगळ्या प्रकरणांत अनेक नेत्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी झालीय. पण राज यांच्या चौकशीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली. याचं कारण म्हणजे भलेही राज यांचे राजकीय विचार कुणाला पटो किंवा न पटोत त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वाचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरांत विखुरलेले आहेत. त्यामुळंच राज यांना ईडीची नोटीस येताच त्याचा संबंध थेट भाजपाशी जोडण्यात आला.  

राजकारणात कुणीही धुतल्या तांदळासारखं नसतं हे साऱ्या जनतेला ठाऊक आहे. म्हणूनच ईडीच्या चौकशीचा आणि भाजपाचा कुठलाही संबंध नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही म्हणाले, तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याएवढी महाराष्ट्रातली जनता दूधखुळी नक्कीच नाही. इथं प्रश्न असा उपस्थित होतो की ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे खरंच शांत बसणार आहेत का? तर सध्या तरी तसं वाटत नाही. कारण तब्बल साडेआठ तासांच्या चौकशीनंतर बाहेर पडलेले राज यांनी ‘कितीही चौकशी करा, माझं तोंड बंद होणार नाही’, या एका वाक्यातच सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. एखादा पक्ष किंवा त्याचा नेता अडचणीचा ठरू लागला की त्याच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा. ही पद्धत काही आताची नाही. भारतीय राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून तपास यंत्रणांचा गैरवापर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळंच सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणाना सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं म्हटलं जातं. पण बहुमतच्या जोरावर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षातील नेत्यांचा या तपास यंत्रणांकडून जो काही पाठपुरावा सुरू आहे. त्याकडं बघता हे सूडाचं राजकारण तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. 

याची ताजी उदाहरणं बघितली तर तुमच्या लगेच लक्षात येईल. पी चिदंबरमला नुकतीच अटक करण्यात आली. त्याशिवाय ममता बनर्जी, संजीव भट्ट, शशी थरूर, मायावती, वीरभद्र सिंह, डी. के. शिवकुमार, भूपेंद्रसिंह हुड्डा, आझम खान, कमलनाथ आणि अहमद पटेल यांचे कुटुंबिय, फारूक अब्दुल्ला, एच. डी.रेवण्णा, रेवंत रेड्डी, ओमर अब्दुल्ला, राघव बहल, प्रणॉय रॉय,  तर राज्यात छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यापैकी काही जणांची झाडाझडती घेण्यात आली, तर काही जणांवर तपास यंत्रणांकडून खटले भरण्यात आलेत.विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी की ज्या नेत्यांवर आधी तपास यंत्रणांच्या चौकशीची सुई होती. त्या नेत्यांनी भाजपाने वेळोवेळी केलेल्या मेगाभरतीतून पक्षप्रवेश केला की पुढं या चौकशीचं काय झालं हे कुणालाही सांगता यायचं नाही.  

राहता राहीला प्रश्न राज ठाकरेंचा. राज्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला भाजपा-शिवसेना सत्ताधारी असोत किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे विरोधक असोत यांच्यापैकी एकाही पक्षाकडं जादुई करिष्मा आणि वत्कृत्वगुण लाभलेला असा नेता नाही. हे सत्य कुठल्याही पक्षातले सामान्य कार्यकर्ते देखील मान्य करतील. राज यांचं भाषण सुरू झालं की भाजपाचा कार्यकर्ताही टीव्ही लावून बसेल, हे कुणाला वेगळं सांगायला नको. राज ठाकरे यांच्याकडं विरोधी पक्षाचा चेहरा बनण्याची ताकद आहे. जनतेच्या प्रश्नावर ते भूमिका घेऊ शकतात आणि ही भूमिका लोकांपर्यंतही प्रभावीपणे पोहोचवू शकतात, याची जाणीव विरोधी पक्षातील नेत्यांनाही असावी. म्हणूनच ईव्हीएमच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय विरोधी नेते राज यांच्यापाठी एकवटल्याचं सर्वांनीच पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणाचं परिवर्तन भलेही मतांमध्ये होऊ शकलं नाही, तरी सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली होती. मोदी-शहांवर केलेले तिखट शब्दांतले वार भाजप नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. ही जखम कदाचीत अजूनही वाळलेली नाही. त्यातच राज यांनी ईव्हीएमचा हाती घेतलेल्या मुद्द्यामुळं या जखमेवर मिठ चोळलं गेलंय. खरं तर राज ठाकरे यांचा मतप्रभाव मुंबई, ठाणे, पुणे-नाशिक या शहरांपलिकडं जाऊ शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांना चांगलंच ठाऊक आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादीची ताकदही संपल्यात जमा आहे. अशा वेळी पुढचं सरकार आमचंच, असा दावा करणाऱ्या भाजपा-शिवसेनेने राज यांच्या चिथावणीची फारशी दखल घ्यायची गरज नव्हती.तरीही सत्ताधाऱ्यांनी ईडीच्या चौकशीतून राज यांच्या हाती आयतं कोलीत दिलं. नोटीस, खटले, चौकशी राज यांच्यासाठी तशी नवी नाही. ९० च्या दशकात किणी प्रकरणात राज सीबीआयच्या तावडीतून सहीसलामत सुटले होते. त्यामुळे ते अशा चौकशांना घाबरून जातील, असं बिलकूल वाटत नाही. या चौकशीतून जे काही तथ्य बाहेर यायचं ते येईलच. उलट या मुद्द्याला इन्कॅश करत ते येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा फेस आणू शकतील. राज अंगावर आलं तर शिंगावर घेणारे नेते असल्याने या ईडी चौकशीच्या पुढं जाऊन राजकारणच्या आखाड्यात ते किती लांब उडी घेतील, हे येणारा काळच सांगेल. 

  


हेही वाचा-

ईव्हीएमविरोधाचं भवितव्य काय?

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेरसंबंधित विषय
Advertisement