Advertisement

मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस

हे आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस
SHARES

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजीच्या औरंगाबाद सभेत राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे. हे आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

1 मे रोजी झालेल्या राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेपूर्वी पोलिसांनी काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. त्यातील काही अटींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांच्या अहवालात आढळून आलं. या सभेतील गर्दी पोलिसांनी सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होती.

तसेच सभेत भडकाऊ भाषण केले, आवाजाची मर्यादा आलांडली, असे आरोपही पोलिसांनी केले आहेत. औरंगाबाद पोलिसांनी सभेचं पूर्ण फुटेज तपासल्यानंतर गृह मंत्रालयाला यासंदर्भातील अहवाल पाठवला होता. तेथे चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 116,117,153 भादविसह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आज या प्रकरणी जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यनोंदणीला नुकतीच सुरुवात झाली आहे.

मंगळवारी मुंबईत राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलं. यावेळी मनसेची भूमिका घरोघरी पोहोचवण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. त्यानंतर आज पुण्यात ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहेत. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं.

दरम्यान, शिंदेसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध युती हा सामना जास्त रंगण्याची चिन्ह आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र मंगळवारी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे पाहता, ते स्वबळावर निवडणुका लढतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.



हेही वाचा

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी

मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा