Advertisement

“राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार, बाकी भूमिपूजन वगैरे…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला देत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

“राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार, बाकी भूमिपूजन वगैरे…”
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन बुधवारी होत आहे. मुंबईतील दादर येथील जुन्या महापौर निवासात हे स्मारक साकारत आहे. या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला देत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत, “स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत. हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय ते फारसं महत्त्वाचं नाही,” असं म्हटलं आहे.

याआधी देखील मनसेने अनेकदा स्मारकाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली होती.

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ न देता अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात असे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. परंतु आमंत्रितांच्या यादीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव नसल्याने भाजप नेत्यांकडून या सोहळ्यावर टीका करण्यात येत आहे. 

आज बाळासाहेब असते तर, पहिलं आमंत्रण देवेंद्रजींना दिलं असतं. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर… फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

तर, सोडलेल्या हिंदुत्वाचं आणि कोत्या मनाचं पुन्हा एकदा दर्शन… निमंत्रण पत्रिकेतून 'हिंदुहृदयसम्राट' गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचं स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब... नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची…, असं ट्विट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी फडणवीसांना निमंत्रण न दिल्याबद्दल टीका केली आहे.

४०० कोटी रुपये मंजूर

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण ४०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

(mns chief raj thackeray is real political inheritor of bal thackeray says sandeep deshpande)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा