राज यांना हाताची साथ? दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट

महाराष्ट्रात येत्या २ महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात गुफ्तगू झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

SHARE

निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेस नेत्या आणि ‘युपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नसला, तरी महाराष्ट्रात येत्या आॅक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये गुफ्तगू झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. 

सुमारे अर्धा तास राज तिथं होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमधील चर्चेत ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुका हे विषय केंद्रस्थानी होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जबरदस्त आघाडी उघडली होती. मनसेने निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार उभा केला नसला, तरी राज यांनी जिथं जिथं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, तिथं जाऊन प्रचार केला होता.

लोकसभा निवडणुकीआधी मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील करून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रयत्नशील होते. परंतु काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासहीत ज्येष्ठ नेत्यांनी मनसेला विरोध केल्याने ही महाआघाडी होऊ शकली नव्हती. या निवडणुकीत एका बाजूला काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचं आव्हान काँग्रेससमोर उभं ठाकलं आहे.  

या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीचा वेध घेत दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची झालेली ही भेट महाआघाडीसाठी आश्वासक ठरणार की नाही, हे लवकरच कळेल. दरम्यान या भेटीचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलं आहे.  हेही वाचा-

जर मॅचच फिक्स असेल, तर खेळून काय फायदा?, असं का म्हणाले राज ठाकरे?

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेकसंबंधित विषय
ताज्या बातम्या