Advertisement

राज ठाकरेंसह इतर नेत्यांची जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली


राज ठाकरेंसह इतर नेत्यांची जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली
SHARES

मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. जॉर्ज फर्नांडिस गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'सम्राट' कायमचा बंद झाला... असा संदेश लिहून राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईसह देशभरातील अनेक कामगार संघटनांचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस करायचे. त्यामुळे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी व्यंगचित्र साकारले आहे.  


केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना 'कोकण रेल्वेचे निर्माते' अशी उपाधी दिली आहे. ते खऱ्या अर्थानं कोकण रेल्वेचे निर्माते होते. ते रेल्वे मंत्री असताना अनेक मंत्रालयांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला विरोध केला. मात्र फर्नांडिस यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता प्रकल्प पूर्ण केला, असं ट्वीट सुरेश प्रभू यांनी केलं आहे.  जॉर्ज फर्नांडिस एक उत्तम संसदपटू होते. त्यांनी देशाचे उद्योगमंत्री आणि सरंक्षणमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता गमावल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. एक चांगला नेता गमावल्याची खंत मला आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

जॉर्ज फर्नांडिस हे माझ्यासाठी हिरो होते. भारतानं एक पुत्र गमावला, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 
हेही वाचा

कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा