Advertisement

विरोधकांची बोलती बंद! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं हिंदीत भाषण


विरोधकांची बोलती बंद! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं हिंदीत भाषण
SHARES

परप्रांतीयांवर तुटून पडणारे, त्यांच्यावर शेलक्या शब्दांत तोंडसुख घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कधी हिंदीतून भाषण करतील, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. परंतु उत्तर भारतीय महामंच समितीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमातील व्यासपीठावर राज यांनी हिंदीतून उत्तमरित्या भाषण करत विरोधक आणि टीकाकारांची बोलती बंद केली. परप्रांतीयांविषयची आपली भूमिका समजावून देताना त्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचंही ठणकावून सांगितलं.


म्हणून स्वीकारलं निमंत्रण

हिंदीतून पहिल्यांदाच भाषणाला सुरूवात करताना राज उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, हे भाषण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकंही बघत असल्याने मी मराठीऐवजी हिंदीतून भाषण करतोय. कारण मनसेकडून मागील काही दिवसांत जी आंदोलने झाली, मारहाण झाली त्यावरून उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्याशी येऊन बोललात तर बंर होईल, अशी विनंती महामंच समितीने केल्याने मी हे आमंत्रण स्वीकारलं, असा खुलासा त्यांनी केला.


हिंदी सुंदर, पण राष्ट्रभाषा नाही

शाळेत असल्यापासून माझी हिंदी उत्तम आहे. माझ्या वडिलांचं उर्दूवर प्रभूत्व होतं. हिंदी ही सुंदर भाषा आहे. मात्र ती राष्ट्रभाषा नाही. कारण तसा निर्णयच झालेला नाही. हिंदी भाषेसारखंच मराठी, कन्नड, मल्ल्याळम इ. भाषांना प्रादेशिक महत्त्व आहे. परदेशात गेल्यावर तुम्ही हिंदीत बोलतात का? असा प्रश्न विचारत राज यांनी स्थानिक भाषांचा मान ठेवलाच पाहिजे, असं मत व्यक्त केलं.


स्थानिकांना नोकरीत प्राधान्य

राज पुढे म्हणाले, मुंबईत येणारे बहुतांश लोकं हे यूपी, बिहार, झारखंड आणि बांग्लादेशमधून येतात. हे सगळेजण नोकरीधंद्यासाठी महाराष्ट्रात येतात. पण इथं आल्यावर त्यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान हा केलाच पाहिजे. महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध असल्याने स्थानिक तरूणांना नोकरीधंद्यात पहिली संधी मिळालीच पाहिजे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये उद्योगधंदे जात असतील, तर तिथल्या स्थानिकांना त्यात प्राथमिकता मिळावी, असं मी म्हटलो यांत गैर काय?


तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा

आजपर्यंत देशात पंतप्रधानपदावर बसलेल्या नेत्यांपैकी ७० ते ८० टक्के नेते हे उत्तर प्रदेशातील हाेते. असं, असलं, तरी त्यांना स्वत: च्या राज्यात रोजगारनिर्मिती करता आलेली नाही. त्यात ते अयशस्वी ठरले. पंतप्रधानाला आपल्या मतदारसंघातील लोकांची मतं चालतात, मग त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ते का सोडवू शकले नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे.


माझ्यावर जाणीवपूर्वक टीका

महाराष्ट्रात जे होतं त्याची देशभर चर्चा हाेते. पण देशातील प्रत्येक राज्यांत प्रादेशिक, भाषिक अस्मितेसाठी संघर्ष होत असतात, त्याची दखल प्रसार माध्यमे घेत नाहीत. रेल्वे आंदोलनाबाबत नेमकं तेच झालं. रेल्वे भरतीची जाहिरात केवळ यूपी, बिहारच्या वृत्तपत्रांमध्ये आली होती. महाराष्ट्रातल्या एकाही वृत्तपत्रात ही जाहिरात आली नव्हती. त्यावर जेव्हा आम्ही रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, तेव्हा आम्हाला अपमानास्पद प्रतिक्रिया मिळाली. मराठी तरूणांवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याने आम्हाला आंदोलन करावं लागलं.


मोदींना प्रश्न नाही

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असं म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचं रक्त उसळलं नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली. त्याबद्दलही कोणीही बोललं नाही. महिन्याभरापूर्वी बिहारींना गुजरातमधून हाकललं. पण असा प्रश्न कोणी नरेंद्र मोदींना विचारला नाही.


भडकवण्याचा प्रयत्न

यूपी, बिहारमधील लोकं कमी पगारावर नोकरी करतात. मराठी तरूण तसं करतील का? असा प्रश्न मला केला जातो. मी असे असंख्य तरूण दाखवू शकतो. परंतु ते कायदेशीरपणे नोकरी-व्यवसाय करत आहेत. फेरीवाला आंदोलनाच्या बाबतीतही माझं हेच म्हणणं आहे. तेव्हा संघर्षाचं कारणच निर्माण होणार नाही. परंतु काही नेते त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दादागिरीची भाषा न करता दोन राज्यांत मैत्रीपूर्ण स्पर्धा असावी, महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची प्रगती व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असं म्हणत राज यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.



हेही वाचा-

राज ठाकरे दिसणार उत्तर भारतीयांच्या मंचावर

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा