Advertisement

नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं?, राज ठाकरे म्हणाले…

एका बाजूला राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे स्थानिकांकडून ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय.

नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं?, राज ठाकरे म्हणाले…
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं नाव देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मात्र विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील याचं नाव असावं या मागणीने जोर धरला आहे. नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन वाद निर्माण झालेला असताना त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns ) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

पनवेलचे भाजपचे (bjp) आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलं. ते म्हणाले, एका बाजूला राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे स्थानिकांकडून ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय. यातून संघर्ष होत असल्याने स्थानिकांच्या मागणीला पाठिंबा मागण्यासाठी प्रशांत ठाकूर माझ्याकडे आले होते.           

कोणतंही विमानतळ उभारण्यात येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर असतं. तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार अशी स्थानिक नावं मिळाली. 

हेही वाचा- संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं- प्रताप सरनाईक

आता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं विस्तारीत विमानतळ आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होत आहे. त्यामुळे ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. म्हणूनच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव योग्य राहील असं मला वाटतं, असं मत राज ठाकरे (raj thackeray) यांनी मांडलं.

हा महाराष्ट्र असून महाराष्ट्राची (maharashtra) राजधानी मुंबई आहे. परदेशातून एखादी व्यक्ती महाराष्ट्रात येते तेव्हा शिवरायांच्या भूमीत येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव योग्य असेल असं मला वाटतं. विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मुळात शिवाजी महाराजांच्या नावावर चर्चा होऊच कशी शकते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

बाळासाहेब स्वत: असते तरी त्यांनी शिवाजी महाराजांचंच नाव द्या असं सांगितलं असतं. शिवाजी महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा आक्षेप नसेल असं प्रशांत ठाकूर यांनी देखील स्पष्ट केलं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा