Advertisement

मनसेत रंगणार स्टारवॉर


मनसेत रंगणार स्टारवॉर
SHARES

दादर – गळती लागलेल्या मनसेकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठकसत्रांना आरंभ झाला आहे. मात्र, २८ नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत वॉर्ड गमावलेल्या स्टार नगरसेवकांसाठी आजूबाजूच्या वॉर्डातील सद्य नगरसेवक तसेच इच्छुकांची विकेट काढण्याचा निर्णय झाल्याची बातमी बाहेर फुटल्याने मनसेमध्ये नाराजीनामा नाट्य सुरू होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
कृष्णकुंजवर झालेल्या या बैठकीत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या नगरसेवकांची विकेट शाबूत राखण्यासाठी श्रद्धा पाटील आणि सीमा शिवलकर या सध्याच्या नगरसेविकांना सेल्फ आऊट करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतला. देशपांडे आणि धुरी यांचे १८५ व १८७ हे वॉर्ड पुनर्रचनेत गायब झाल्याने त्यांनी शेजारच्या वॉर्डांवर अतिक्रमण केल्याची भावना मनसेतील एका सूत्राने सांगितले. विशेषतः दादर-माहीम-प्रभादेवी भागातील मनसेचे वर्चस्व असलेल्या मनसेच्या ७ वॉर्डांपैकी २ वॉर्ड गायब झाले. त्यामुळे नव्याने वाटणी करण्याबाबत सदर बैठकीत बराच खल झाला. अखेर, देशपांडे आणि धुरी यांच्यासाठी १८२ आणि १९४ हे खुले झालेले वॉर्ड निवडण्यात आले. परंतु, त्यामुळे श्रद्धा पाटील या विद्यमान नगरसेविकेला घरी बसावे लागण्याचे संकेत आहेत. श्रद्धा पाटील या १९० या वॉर्डातून इच्छुक असल्या तरी तिथे विरेंद्र तांडेल हे त्यांच्या पत्नीसाठी तिकीट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर, १९१ वॉर्डातून विभागप्रमुख प्रकाश पाटणकर आणि सध्याचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्यात आपापल्या पत्नींसाठी अंतर्गत सामना रंगणार आहे. दुसरीकडे संतोष धुरींना १९४ वॉर्ड दिल्याने नगरसेविका सीमा शिवलकर यांना १९३ मधून वाघाच्या तोंडी म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यासमोर उभे राहण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा