नायगाव बीडीडी चाळीच्या 12 इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रस्ते आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मुंबईमधील वरळीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत लवकर निर्णय घ्यावा यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे मागणी देखील करण्यात आली.
शिवडी व नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. भूमिपूजन होऊनही शिवडी बीडीडी चाळीच्या 12 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. कारण शिवडीमधील 5.72 एकर जागेवरील 12 इमारती या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर आहेत. या 12 इमारतीमध्ये एकूण 960 घरांचा पुनर्विकास होणार की नाही, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
याबाबत मनसेकडून मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय जहाज आणि वाहतूक मंत्रालयाने टाऊनशिपसाठी जमीन धोरण निश्चित केल्यानंतरच मुंबई पोर्ट ट्रस्ट जमीन म्हाडाला पुनर्विकासाठी हस्तांतरीत करू शकते, असे मुंबई पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवडीमधील या 12 इमारतींच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय जहाज आणि वाहतूक मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळणे आवश्यक आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले आहे.