Advertisement

...तर मनसे स्टाईल दाखवू - शालिनी ठाकरे


...तर मनसे स्टाईल दाखवू - शालिनी ठाकरे
SHARES

तथाकथित प्रतिष्ठित शाळेमध्ये चिमुरड्या मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलांच्या सुरक्षेविषयी राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि विश्वस्तांना पत्र लिहिले होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील शाळांमध्ये हे पत्र नेऊन दिले. यासोबत 'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली नाही, तर मनसे स्टाईल दाखवू', असा इशारा शालिनी ठाकरे यांनी रायन इंटरनॅशनल स्कूलला दिला.



गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची चर्चा सध्या देशपातळीवर सुरू आहे. देशभरातील रायन इंटरनॅशनल स्कूल्सचे मुख्यालय कांदिवली ठाकूर संकुलातील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. 

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी या शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत आणि प्रेम शेट्टी यांची भेट घेतली. 'भविष्यात तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत, तर मनसेचे पदाधिकारी तुमच्या शाळेवरच जागता पहारा ठेवतील' अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वादग्रस्त रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना इशारा दिला.



शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेत रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरक्षाविषयक बाबींचा कसा बोजवारा उडालेला आहे, याचा पाढाच शालिनी ठाकरे यांनी वाचला.

"यापुढे तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही, तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्यास तुम्ही असमर्थ ठरले हेच सिद्ध होईल. खरंतर शिक्षणसंस्था म्हणून असलेली तुमची परवानगीच रद्द व्हायला हवी, मात्र हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही तशी मागणी करत नाही", असेही शालिनी ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

चर्चेच्या अखेरीस शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत यांनी "शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सर्व प्रकारची सुरक्षाविषयक यंत्रणा यामध्ये तत्काळ सुधारणा करू" असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.


हेही वाचा - 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज ठाकरेंनी उचलले हे पाऊल



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा