Advertisement

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी संजय तुर्डे ची लाचलुचपत विभागाकडे तक्रार


शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी संजय तुर्डे ची लाचलुचपत विभागाकडे तक्रार
SHARES

नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणानंतर शिवसेना आणि मनसेत कायदेशीर लढाई खेळली जात असतानाच आता मनसेचे एकमेव आणि एकनिष्ठ नगरसेवक संजय तुर्डे यांच्यावतीने आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे या फुटीर नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखवण्यात आल्याची तक्रार करत याप्रकरणी दिलीप (मामा) लांडे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.


मनसेच्या सहा नगरसेवकांनी एकत्रपणे फुटून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सहा नगरसेवकांनी याबाबत निवड कोकण विभागीय आयुक्त यांना दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेनंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी प्रत्येकी 3 कोटी रुपये घेऊन नगरसेवक फोडले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या नगरसेवकाना प्रत्येकी 5 कोटी दिल्याचा आरोप केला होता.  या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.


यापूर्वी किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली आहे. आता तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार करून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठीआपल्याला आर्थिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप करत तत्कालीन मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी प्रलोभन दाखवल्याची तक्रार केली आहे. नगरसेवक फोडण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुर्डे यांनी केली आहे. आपण ऑनलाईनद्वारे हे पत्र पाठवले असल्याची माहिती तुर्डे यांनी दिली आहे.


संजय तुर्डे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीत शिवसेना प्रवेशाबाबत त्यांनी माझ्याशी विचारणा केली होती. परंतु आपल्याशी कोणतीही आर्थिक चर्चा झाली नव्हती, असे सांगितले होते. परंतु आता तेच संजय तुर्डे आता लाचलुचपत विभागाकडे तक्रार करत असल्यामुळे ते नक्की किती खरे बोलतात हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, यामाध्यमातून मनसे, या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेतील अधिकृत प्रवेशाला खीळ घालून त्यांना कसे तंगवत ठेवता येईल याची रणनीती खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा