“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.” असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
“राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी आयोध्या आठवली आहे, त्यांना आयोध्याला जायचं आहे. पण त्यांनी यापूर्वीच अयोध्याला जायला हवं होतं. त्यांच्या विरोधात उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. आपण भारतात राहणारे सर्व भाषी एकच आहोत याचा विचार त्यांनी करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीयांनी केला नव्हता, तेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा.” असा सल्लाही त्यांनी ठाकरे यांना दिला.
“मुंबईत मराठी माणसावर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पण जी कामे यापूर्वी मराठी माणसं मुंबईत करायची ती कामे हल्ली मराठी माणसं करत नाहीत, म्हणून उत्तर भारतीय लोक मुंबईत वाढले आहेत. उत्तर भारतीयांनी त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, हल्ली राज ठाकरे यांनी भगवे वस्त्र अंगावर घेतले आहे. परंतु हे भगवे वस्त्र हा क्रांतीचा आणि शांततेचा रंग आहे. भगवान गौतम बुद्धांनीही हे वस्त्र परिधान केले आहे. भगवे वस्त्र परिधान करणारा माणूस वाद पेटवत नाही. समाजा-समाजामध्ये विष कालवत नाही. तुम्ही हिंदू आहात तुम्हाला अयोध्याला जाण्याचा अधिकार आहे. त्यापूर्वी तुम्ही उत्तर भारत यांची माफी मागा. त्यांच्या मनाचाही विचार करा.”
हेही वाचा