Advertisement

'कितीदा हृदय जिंकणार...'; 'त्या' कृतीमुळं नेटकऱ्यांकडून अमित ठाकरेंचं कौतुक

अमित ठाकरे हे मनसेकडून होणाऱ्या प्रत्येक समाजकार्यात सक्रीय पाहायला मिळतात. अशाच त्यांच्या कार्यामुळं अमित ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

'कितीदा हृदय जिंकणार...'; 'त्या' कृतीमुळं नेटकऱ्यांकडून अमित ठाकरेंचं कौतुक
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात युवानेता म्हणून नेहमीच चर्चेत असतात. अमित ठाकरे हे मनसेकडून होणाऱ्या प्रत्येक समाजकार्यात सक्रीय पाहायला मिळतात. अशाच त्यांच्या कार्यामुळं अमित ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेकडून शनिवारी राज्यभरात समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या होत्या. दादर चौपाटीवर कार्यकर्त्यांच्या साथीनं अमित यांनी साफसफाई केली. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर अमित ठाकरे यांना साईबाबांची एक मूर्ती पडलेली दिसली. तेव्हा अमित ठाकरे यांनी तात्काळ पायातील बूट काढून साईबाबांची मुर्ती जमिनीवरुन उचलली. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना मूर्तीचे योग्य जागी विसर्जन करण्यास सांगितले.

अमित ठाकरे यांच्या याच कृतीचं सध्या प्रचंड कौतुक केलं जात आहे. याबाबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तर ''अमितजी कितीदा हृदय जिंकणार?'', असं म्हणत कौतुक केलं आहे.

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेंतर्गत मनसेकडून राज्यातील ४० समुद्रकिनाऱ्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी अमित ठाकरे यांनी समुद्रकिनाऱ्यांच्या दुरावस्थेवरुन शिवसेनेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

''मुंबईतील समुद्रकिनारे कधीही इतके घाणेरडे नव्हते. गेल्या १५ वर्षात ही परिस्थिती ओढावली आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आहे. अशी यंत्रणा हाती असल्यास आपण ५ वर्षात काय करु शकतो, याचा तुम्ही विचार करावा. मग यांच्याकडे २५ वर्षे सत्ता असून तुम्हाला समुद्र किनारे साफ करता आले नाहीत का? आजपर्यंत त्यांनी काम केले असते तर आम्हाला समुद्रकिनारे साफ करण्याची वेळ आली नसती'', असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

राज्याचे पर्यावरण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याचा सवाल यावेळी प्रसारमाध्यमांनी अमित ठाकरे यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी ''त्यांची कोणाचीच काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळं नागरिकांनी ही जबाबदारी आता आपल्या हातात घेतली पाहिजे'', असं आवाहन अमित ठाकरे यांनी केले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा