राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेट निर्माण करण्याची घोषणा केली होती. आज मनसेच्या वर्धापन दिनी या कॅबिनेटची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. २५ ते २८ नेत्यांचे हे शॅडो कॅबिनेट असणार असून या कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांना स्थान देण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचाः- मुंबईतील माझगावची हवा दिल्लीहून खराब
उद्या ९ मार्च रोजी मनसेचा १४ वा वर्धापन दिन आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत या वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर एक बैठक पार पडली. त्यात शॅडो कॅबिनेटच्या नियुक्त्या आणि रचनेवर अंतिम हात फिरविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर यांच्याकडे गृह तर संदीप देशपांडे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे. तर नितीन सरदेसाईंना वित्त आणि रिटा गुप्ता यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग देण्यात आला आहे. या शिवाय अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत आणि रणजीत शिरोडकर यांचा या शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचाः- Yes Bankःराणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखल
राज्यातील ठाकरे सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्याचा पंचनामा करण्यासाठी आणि सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट कार्यरत असेल असे सांगण्यात येते. त्यासाठी या शॅडो कॅबिनेटमध्ये माजी आमदार आणि आजी-माजी नगररसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या शॅडो कॅबिनेटच्या पदाधिकार्यांना कामकाज कसे करावे याचे ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आज मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे या शॅडो कॅबिनेटची घोषणा करतील. या कॅबिनेटचा कालावधी किती वर्षांचा असेल हे सुद्धा उद्याच जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे हे शॅडो कॅबिनेट कसे असेल? आणि कशा पद्धतीने ते काम करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.