मुंबई – मेट्रो -3 प्रकल्पाविरोधात काँग्रेस, मनसे आणि सपा यांनी एक साथ दंड थोपटले आहेत. या प्रकल्पासाठी पालिकेचे भूखंड फुकटात देण्यास तिन्ही पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
मेट्रो-3 प्रकल्पासाठी पालिकेचे भूखंड तात्पुरते आणि कायमस्वरूपी हवे आहेत. पालिकेने मात्र हे भूखंड देण्यास विरोध केल्याने हा प्रकल्प मार्गी लागण्यात अडचणी येत होत्या. अखेर मुंबई महानगरपालिकेने त्वरित 17 भुखंड हस्तांतरीत करावेत, असे आदेश नुकतेच मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावरून पालिकेतील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.
पालिकेच्या मोकळ्या भूखंडाच्या बदल्यात एमएमआरडीएकडून बीकेसीतील मोकळे भूखंड मिळाले तरच पालिकेचे भूखंड प्रकल्पासाठी द्यावेत, अशी मागणी मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच विस्थापितांच्या पुर्नवसनाचा मुद्दाही योग्य प्रकारे मार्गी लावण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.
पालिकेतील सत्ताधारी शिवसेना सुरूवातीपासून मेट्रो-3 च्या विरोधात असून आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शिवसेनेची गोची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना याप्रकरणी काय भूमिका घेते याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, महापौरांना याविषयी विचारले असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी मनसे, सपा, काँग्रेस मात्र याप्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतरही पालिका भूखंड हस्तांतरीत करणार का? हाच प्रश्न आहे.