हा शेवटचाच पराभव - राज ठाकरे

  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मौन सोडले. महापालिका निवडणुकीतील पराभव राज ठाकरे यांच्या जिव्हारी चांगलाच लागला आहे. विरोधकांनी जे फासे टाकले आहेत. त्याच फाशांनी मी आता खेळणार असल्याचे सांगत हा शेवटचा पराभव असल्याचे भाकीत त्यांनी केले. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेतील हा मनसेचा पराभव शेवटचा असेल. यापुढे पराभव नाही पाहणार असे सांगत विधानसभेच्या कामाला लागा, असा संदेशच त्यांनी मनसे कायकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला.
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ११ वा वर्धापनदिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. राज ठाकरे हे या सभेला फ्रेंच कट दाढीमध्ये अवतरले. त्यामुळे सभागृहात एकच चर्चा सुरु होती. याचा कानोसा घेत राज ठाकरे यांनी आपण केवळ दाढी करता न आल्यामुळे अशाप्रकारे दाढी कोरली असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे मनातील शंकेचे निरसर केले. मात्र, प्रारंभीच आपण आजवरच्या सभेपेक्षा छोटे भाषण करणार असल्याचे स्पष्ट करत आपण पराभवाबाबत काहीच बोलणार नाही. तुम्ही खचून जावू नका,असेही सांगणार नाही. परंतु निवडणूक निकालाबाबत मतदान यंत्रांबाबत ज्या चर्चा माझ्या कानावर सर्व ठिकाणांहून ऐकायला येत आहे, ते जर खरे असेल ते भयानक असल्याचे त्यांनी सांगितले. पण याबाबत मी एवढंच सांगेन की पैसा जिंकला, काम हरले.


  निवडणूक कशी लढवायची ते शिकलो

  मनसेला ज्यांनी मतदान केले त्या सर्वांचे धन्यवाद! ज्यांनी नाही केले त्यांनी राज ठाकरेंना निवडणूक कशी लढवायची ते शिकवले. काम करून निवडणूक लढवता येत नाही. आता लोकांना काय हवे, तसाचा पुरवठा होईल,असे त्यांनी सांगितले. वाद, भांडण आणि शिव्या यांचे गुऱ्हाण मांडले जात आहे. आपण काम केले आहे. पण काम केले हीच मोठी चूक झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. काम करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे या निवडणुकीत शिकल्याचेही त्यांनी सांगितलं. काम न करता ही लोक निवडून आली. त्यांचे काहीच काम नाही. साधे त्यांच्याकडे उमेदवार नाही. त्यांना मतदान होते. परंतु आमच्या नगरसेवक, शाखाप्रमुख यांनी जी कामे केली, त्यांना मतदान होत नाही. पण झाले ते झाले पण मला आता समजले की निवडणूक कशी लढवायची ती,असे त्यांनी बोलून दाखवले.

  परिचारिकला चौकाचौकात फोडून काढा
  भाजपा समर्थक आमदार असलेल्या प्रशांत परिचारिकच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत राज ठाकरे यांनी या माणसाला चौकाचौकात फोडून काढायला हवे. आम्ही पाक कलावंताबाबत बोलल्यावर विरोध होतो. भाजपाचा आमदार असल्यामुळे काहीही बोलले तरी खपून जाते. एवढी सर्व कामे नाशिकमध्ये केली. पण काय बोलणार नाशिककरांबाबत असे सांगत ज्यांना नाशिक माहीत नाही त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जो पायंडा पाडला यापेक्षा लोकांनी जो पायंडा पाडला तो भयानक असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केले.

  आता मी तुम्हाला येणार भेटायला
  आजवर तुम्ही मला भेटायला येत होता. परंतु आता मी तुम्हाला भेटायला येईन,असे सांगत तमाम मनसेच्या कार्यकर्त्यांमधील भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यावेळी सभागृहात एकच टाळयांचा कडकडाट झाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.