पेल्यातलं वादळ

 Pali Hill
पेल्यातलं वादळ

मुंबई - 1000 आणि 500 रुपयांचं चलन बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेनेनं तलवार म्यान केल्यामुळे शिवसेना-भाजपा मध्ये रंगणारं संभाव्य संघर्षनाट्य थंडावलं आहे. आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधानांच्या भेटीला गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मोदींनी भावूक शब्द पेरत बोळवण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या 13 खासदारांना पंतप्रधानांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली. “वर गेल्यावर मी बाळासाहेबांना तोंड दाखवेन. तुमची बाळासाहेबांच्या समोर उभं राहण्याची हिंमत तरी होईल का?” असा अडचणीचा पण बिनतोड प्रश्न विचारत मोदींनी शिवसेनेचं विरोधास्त्र निष्प्रभ करून टाकलं. दिल्लीत स्वतः मुख्य भूमिकेत राहत हे घडवून आणणाऱ्या पंतप्रधानांनी मुंबई फत्ते करण्याची म्हणजे उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवली होती.

नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली. आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी ही भेट घेतल्याचं गडकरी सांगत असले तरीही ही भेट केवळ कौटुंबिक जिव्हाळ्यापुरती नव्हती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकांवरून आळवल्या जाणाऱ्या सुरांना मित्रपक्ष शिवसेनेची साथ मिळू नये, याविषयी मोदी आग्रही आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदी यांनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी या विषयावर चर्चाही केली. शिवसेनेशी जुळवून घेताना भाजपाला नमतं घ्यावं लागणार नाही, अशी पावलं उचलण्याचं बैठकीत ठरलं. शिवसेनेच्या शिष्टमंडळाला भेटताना खुद्द पंतप्रधानांनीही बैठकीत ठरलेलं हेच धोरण पाळलं. याचा परिणाम पंतप्रधानांना अपेक्षितच झाला. शिवसेनेचे खासदार नरमले असले तरी उद्धव यांना न दुखावता त्यांची समजूत काढणं गरजेचं होतं. कन्येच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उद्धवगृही दाखल झालेल्या गडकरींनी पंतप्रधानांचा निरोप उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला. यानिमित्तानं दोन मुद्दे नव्याने समोर आले. एक संघर्षाचा नारा देणारे शिवसेना खासदार याबाबतीत आरंभशूर ठरले. दुसरा शिवसेना पक्षप्रमुखांची समजूत काढण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी बऱ्याच काळानंतर भाजपा नेत्याला मातोश्री गाठावी लागली.

Loading Comments