Advertisement

'अमृता'यण


'अमृता'यण
SHARES

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यवसायानं बँकर असलेल्या पत्नी अमृता फडणवीस यांना गात्या गळ्याची देणगी लाभलीय, हे एव्हाना जगजाहीर झालंय. मॉडेलिंगमधला त्यांचा सहज वावरही अनेकांनी पाहिलाय, कौतुकही केलंय. पण याखेपेस मात्र सौ. मुख्यमंत्री यांना त्यांच्या कलाविष्काराबद्दल टीकेचं धनी व्हावं लागतंय. अमृता फडणवीस आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या म्युझिक अल्बममधल्या गाण्यामुळे राजकारण रंगतंय.
मुंबईतल्या रॉयल ऑपेरा हाउसमध्ये चित्रित झालेल्या या गाण्यावर टीका करताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी, 80 जणांच्या मृत्यूसाठी चलनबंदी कारण असल्याचं ट्विट केलंय. नव्या चलनाचे लाभार्थी अमिताभ बच्चनसोबत नृत्य करत असल्याचं जळजळीत ‘ट्विटरास्त्र’ निरुपम यांनी सोडलंय. ‘मुंबई लाइव्ह’शी या विषयावर बोलताना निरुपम यांनी अमृता फडणवीस यांच्या संवेदनशीलतेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “प्रत्येक व्यक्तीला आपला छंद जोपासण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून तुमच्याकडे किमान संवेदनशीलता असणं अभिप्रेत आहे. चलनबंदी झाल्यानंतर बँकांच्या रांगेत अनेकांचे मृत्यू झाले. इतकंच नाही, अमिताभ बच्चनसोबत नृत्य करत असताना देशाच्या सीमेवर 7 जवान हुतात्मा झाले. याची जाणीव मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला असायला नको का?” हा प्रश्न विचारणा-या संजय निरुपम यांना भाजपानंही प्रत्युत्तर दिलंय. भाजपाचे प्रवक्ता माधव भांडारी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला प्रतिक्रिया देताना, “निरुपम हे अत्यंत असभ्य गृहस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करताना नेमकं काय बोलावं, एवढीही समज त्यांच्यात नाही.” अशा शब्दांत निषेध व्यक्त केला.
कला आणि राजकारण यांच्यात गल्लत करु नये, असं म्हणणा-या अनेकांनीही या वादात उडी घेतलीय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठीचे विधी-निषेध आणि मुख्यमंत्र्यांची पत्नीचं स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व या मुद्द्यांभोवती वाद घुटमळत असताना अहमद खान दिग्दर्शित करत असलेल्या या व्हिडिओ अल्बमला मात्र आयती प्रसिद्धी मिळालीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा