Advertisement

आजच मोठा निर्णय अपेक्षित, अस्लम शेख यांची माहिती

लोकांचा जीव वाचवणं यालाच सरकारचं प्राधान्य आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने आता जास्त वेळ दवडण्यात अर्थ नाही, असं सरकारचे मत असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलं.

आजच मोठा निर्णय अपेक्षित, अस्लम शेख यांची माहिती
SHARES

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची विस्फोटक परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिवसअखेरपर्यंत लाॅकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam sheikh) यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 

मुंबईसह राज्यातील परिस्थितीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं की, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचं (coronavirus) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जे करावं लागेल, ते करण्याची सरकारची मानसिकता आहे. कारण लोकांचा जीव वाचवणं यालाच सरकारचं प्राधान्य आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने आता जास्त वेळ दवडण्यात अर्थ नाही, असं सरकारचे मत असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलं.

सरकारकडून लाॅकडाऊन लावण्याचे संकेत मिळू लागताच परप्रांतीय पुन्हा एकदा गावी जाण्यासाठी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनांवर गर्दी करू लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासंदर्भात अस्लम शेख यांना विचारलं असता ते म्हणाले, मागच्या वेळेस केंद्र सरकारने जेव्हा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला होता, तेव्हा परप्रांतीयांची मोठी तारंबळ उडाली होती. तसं आम्हाला करायचं नाही. त्यामुळेच आम्ही मागील २ महिन्यांमध्ये राज्यात हळुहळू निर्बंध कडक करत आणले आहेत. आधी नाईट कर्फ्यू, विकेंड लाॅकडाऊन सह कडक निर्बंध घातले. व्यापारी, दुकानदार, परप्रांतीय मजूर सर्वांना आम्ही पुरेस वेळ दिला आहे.  जेणेकरून कुठेही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये. 

हेही वाचा- कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेची नवी रणनीती

एवढंच नाही, तर मागच्या ४ दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री असोत मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, सचिव स्तरावरील अधिकारी सर्वच जण प्रत्येक घटकाशी चर्चा करत आहेत. विरोधी पक्ष, व्यापारी, सर्वसामान्य जनता सर्वांची मतं जाणून घेतली. कडक निर्बंध घालूनही संसर्ग आटोक्यात येत नसेल, तर लोकांचा जीव वाचवणे यालाच सरकारचं प्राधान्य राहील आणि त्याचदृष्टीने निर्णय घेण्यात येईल, असं अस्लम शेख म्हणाले.

लसीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, कोरोनाची सुरूवात देशात झाली तेव्हाही मुंबई आणि महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक रुग्ण दिसून येत होते. कारण महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत असल्यानेच कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसून येत आहे. चाचण्यांच्या माध्यमांतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यावर उपचार करणं हे सरकारचं लक्ष्य आहे. मुंबईतील जवळपास ४ जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून ५ हजार नवे बेड्स उपलब्ध करून देत आहोत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व तऱ्हेच प्रयत्न करण्यात येत असल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. 

(mumbai guardian minister aslam sheikh give hints about lockdown in maharashtra)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा