Advertisement

सिल्व्हर ओक हल्लाप्रकरण: मुंबई पोलिसांची सायबर सेलकडे धाव

दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेले वकील गुणरतन सदावर्ते यांची चौकशी सुरू आहे, असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं.

सिल्व्हर ओक हल्लाप्रकरण:  मुंबई पोलिसांची सायबर सेलकडे धाव
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील (Mumbai) सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.

गावदेवी पोलीस आता आंदोलकांच्या कॉल डेटा रेकॉर्ड आणि सोशल मीडिया चॅट्सची तपासणी करत आहे. आता यात कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा सहभाग आहे का याची तपासणी केली जात आहे.

आंदोलनापूर्वी पवारांच्या निवासस्थानाची कोणी रेकी केली आहे का? हे शोधण्यासाठी पोलिसांनी १० ते १२ दिवसांचे सिल्व्हर ओकजवळील सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेले वकील गुणरतन सदावर्ते यांची चौकशी सुरू आहे, असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं.

पवार यांच्या निवासस्थानाबाहेर गोधळ केल्याप्रकरणी शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी २३ महिला आणि वकील सदावर्ते यांच्यासह ११० आंदोलकांना अटक केली. घटनेनंतर लगेचच मलबार हिल परिसरातून किमान १०४ जणांना अटक करण्यात आली. तर इतर सहा जणांना रात्री उशिरा अटक करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर गुणरतन सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच MSRTC च्या १०९ कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला, जो दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळला. ते आता सत्र न्यायालयात जाणार आहेत.

आंदोलक सिल्व्हर ओकच्या बाहेर जमले होते आणि त्यांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी असा दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काहीही केलं नाही. अखेर पोलिस कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी आंदोलकांनी घरावर दगडफेकही केली.

पोलिसांना या कटामागील सूत्रधार शोधायचा आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पवार यांच्या बंगल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असावा असा संशय आहे. कारण घटनेच्या दोन दिवस आधी पवारांच्या निवासस्थानावर काही लोक संशयास्पदरीत्या फिरताना दिसले होते. त्यांची ही हालचाल परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही.



हेही वाचा

झेड प्लस सुरक्षा असूनही शरद पवारांच्या घरावर हल्ला कसा? धक्कादायक माहिती उघड

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर मोठी कारवाई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा