Advertisement

महापालिकेचा ५ वर्षांत १०० कोटींचा घोटाळा- आशिष शेलार

मान्सून दाखल झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. यावरून आता पुन्हा महापालिकेवर टीका केली जात असून, भाजप नेते आशिष शेलार यांनीही पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

महापालिकेचा ५ वर्षांत १०० कोटींचा घोटाळा- आशिष शेलार
SHARES

मुंबईत बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसानं (mumbai rains) हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं मुंबईतील रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं चाकरमान्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. मात्र, मान्सून दाखल झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. यावरून आता पुन्हा महापालिकेवर (bmc) टीका केली जात असून, भाजप नेते आशिष शेलार (ashish) यांनीही पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

'पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याला जबाबदार कोण? यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. 'पहिल्या पावसातच कटकमिशनचे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेचि येतो पावसाळा, पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!', असंही ट्वीट करत आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

या ट्वीटसोबत पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आशिष शेलार यांनी मुंबईत ५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. 'पहिल्या पावसामध्ये पुन्हा मुंबई तुंबली. दुर्दैवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला. १०४ टक्के किंवा १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनाने काम केलं नाही. कंत्राटदाराने पळ काढला. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कृत्यांवर पांघरूण घातलं. मुंबईत दरवर्षाला ७० ते १०० कोटी रुपये खर्च होतात. ५ वर्षांत ५०० कोटी रुपये. ते सोडून छोटे नाले, स्टॉर्म वॉटर ड्रेन, दुरुस्ती वा अन्य कामांसाठीचे दरवर्षाला १०० कोटींप्रमाणे असे ५ वर्षाला ५०० कोटी. म्हणजे ५ वर्षांत १ हजार कोटींचा खर्च करूनही मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची वेळ आली', असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

मुंबईतल्या ज्या भागांत आधी पाणी साचत नव्हतं, तिथेही आता पाणी साचलं आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 'स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये मलब्याच्या गोण्या पडल्या आहेत. एकीकडे नागरिकांना मलब्याच्या गोण्या आणि दुसरीकडे मलईच्या गोण्या कंत्राटदाराकडे हे विदारक चित्र मुंबईकरांसमोर येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जिथे पाणी तुंबत नाही, त्या ठिकाणी देखील पाणी तुंबलंय', असं आशिष शेलार म्हणाले आहेत. 'आता तरी मुंबईकरांची काळजी घ्या', असं आवाहन देखील त्यांनी ट्वीटमधून सत्ताधाऱ्यांना केलं आहे.

बुधवारपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारपर्यंत अनेक भागांत पावसाचा जोर कायम होता. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाला. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. त्यामुळे मुंबईत १०० टक्क्यांच्या वर नालेसफाई झाल्याच्या दाव्यांचं काय झालं? असा सवाल मुंबईकरांना पडला आहे.



हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा