Advertisement

जीएसटी संदर्भातील रात्रीची बैठक टळली


जीएसटी संदर्भातील रात्रीची बैठक टळली
SHARES

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘जीएसटी’ विधेयकावर एक प्रेझेंटेशन दिले. ही बैठक सकारात्मक झाली असली तरी, सोमवारी रात्री मातोश्रीवर याच संदर्भात अंतिम बैठक होणार होती. मात्र मुनगंटीवार रात्रीच्या बैठकीला मातोश्रीवर न गेल्याने ही बैठक टळली. त्यामुळे जीएसटी संदर्भातील केवळ ड्राफ्टच  मातोश्रीवर पाठवला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

‘जीएसटी’ विधेयकाला मंजुरी देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन दि. 20 ते 22 मे या कालावधीत होणार आहे. ‘जीएसटी’मुळे जर मुंबई महापालिकेच्या स्वायत्ततेला धोका निर्माण होणार असेल तर, त्याला विरोध करण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संभाव्य विरोध टाळण्यासाठीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रेझेंटेशन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीचा अंतिम प्रस्ताव विधीमंडळात मांडण्याआधी तो मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाणार आहे.

संपूर्ण देशात एकच करप्रणाली अंमलात यावी यासाठी जीएसटी विधेयक तयार करण्यात आले असून देशातील सुमारे 11 राज्य सरकारांनी ते यापूर्वीच पारित केले आहे. राज्यात हे विधेयक पारित करण्यासाठी 20 ते 22 मे या कालावधीत एक विशेष अधिवेशन आयेजित करण्यात आले आहे. या मुद्द्यावर शिवसेनेच्या मदतीने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.

[हे पण वाचा - ...तर शिवसेनेचा जीएसटीला विरोध]

जीएसटीसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांसाठी आणि नगरसेवक यांच्यासाठी एक मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी जीएसटीबाबत मत व्यक्त करताना “जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असेल आणि निधीसाठी महापालिकेला लाचार होऊन, हाती कटोरा घेऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारात जावे लागणार असेल तर, या विधेयकाबाबत पुनर्विचार करावा लागेल” असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संभाव्य विरोध टाळण्यासाठीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थखात्यातील संबंधित अधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विशेष प्रेझेंटेशन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

[हे पण वाचा - शिवसेना नेत्यांनी जीएसटीसंदर्भात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट]

बैठक संपल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर मुंबई महापालिकेला जकात कर वसूल करता येणार नाही. मात्र त्याची पूर्ण नुकसानभरपाई राज्य सरकार देणार आहे. दरवर्षी या नुकसानभरपाईत काही टक्के वाढही करण्यात येणार असून तशी कायदेशीर तरतूद करणार आहोत. मुंबई महापालिकेला महिनाभरची देय रक्कम महिन्यापूर्वी देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या सूचना केल्या, त्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली, या सूचनांवर कायदेशीर तरतूद केली जाईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा