शिवसेना नेत्यांनी जीएसटीसंदर्भात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


SHARE

शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि रवींद्र वायकर यांनी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी या मंत्र्यांनी 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली. तसेच मुंबई महापालिकेला जकातच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर मिळत असल्याने जीएसटीमुळे मुंबई महापालिकेला कोणत्याही प्रकारचा तोटा होता कामा नये अशी मागणी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

देशासह राज्यात एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्यावर मुंबई पालिकेला पाच वर्ष निधी राज्य सरकारकडून मिळावा ही मागणी शिष्टमंडळाने मुखमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. जकात रद्द झाल्याने दरवर्षी पालिकेचे सुमारे 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तेव्हा ही रक्कम मुंबईला मिळावी, यासाठी कायद्यात तरतूद करण्याची मागणी शिवसेनेने केली.

यासंदर्भात गृह निर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांंनी जीएसटी लागू करण्यापूर्वी राज्य सरकार कोणती पावले उचलणार आणि मुंबई महापालिकेला होणारा तोटा कशा प्रकारे भरून काढला जाईल यासंदर्भात माहिती घेतली. याबाबत सुनावणीही ठेवण्यात येणार असल्याने शंकेचे निरसनही त्यावेळी होईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांना वेगळा कर गोळा करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकार संबंधित स्थानिक संस्थांना नुकसान भरपाई दरवर्षी देणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या