विधेयक क्र. 34 ला मातोश्री विधेयक नाव द्या - जयंत पाटील

  Nariman Point
  विधेयक क्र. 34 ला मातोश्री विधेयक नाव द्या - जयंत पाटील
  मुंबई  -  

  विधानसभेत जीएसटीसंदर्भात विधेयक क्रंमाक 34 बाबत चर्चा सुरू असताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या विधेयकाला क्रमांक 34 न म्हणता त्याचे नाव मातोश्री विधेयक ठेवावे असा टोला लगावला.
  जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेना आणि भाजपावर चौफेर टीका केली. या विधेयकाला मान्यता देण्यासाठी अर्थमंत्र्यांना मातोश्रीवर जावे लागते. चहा किंवा जेवायला मातोश्रीवर जाण्याची अडचण नाही. पण अर्थमंत्री सर्व लवाजमा घेऊन जातात आणि नाशिकला उद्धव ठाकरे अशा प्रकारचे भाषण करतात, ती मोठी अडचण आहे. राज्य सरकारचे धोरण आणि विधेयक सभागृहाच्या बाहेर चर्चा करून विधिमंडळात मांडले जात आहे, हे मुख्यमंत्र्यांनाही पटले नसेल अशी खात्री असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

  मुंबई महापालिकेसोबत राज्यातील सर्व महापालिकांच्या कर्त्याधर्त्यांना बोलावून मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. उद्धव ठाकरे यांनी जीएसटीविरोधात वक्तव्य केले तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा ताफा घेऊन मातोश्रीच्या अष्टप्रधान मंडळाला प्रेझेंटेशन दिले, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली, 'मुख्यमंत्री वाघ्याच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजण्यात व्यस्त होते, भाजपाचे मंत्री विधेयकासाठी नाही तर, राष्ट्रपती पदासाठी उत्सुक जास्त दिसतात, त्यांना शिवसेनेच्या मतांची गरज असल्याने शिवसेनेला दुखवायचे नाही असा धोरणात्मक निर्णय मातोश्रीच्या बैठकीत झाला.

  जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या आमदारांनी आक्षप घेतला, तेव्हा त्यांना उत्तर देताना आपण शिवसेनेच्या ताकदीबद्दल बोलत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. यावेळी सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर गेले. पाटील यांच्या या वक्तव्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आक्षेप घेतल्यानंतर, मुनगंटीवार मातोश्रीवर गेले याचे दु:ख नाही, तर ते ज्या प्रकारे मातोश्रीच्या मोठेपणाबद्दल बोलत होते त्याचे दु:ख होत असल्याचे वक्तव्य जयंट पाटील यांनी केले. मुंबईच्या अस्तित्वाला आणि मुंबईच्या सामान्य मराठी माणसाला टिकवण्याचे काम शिवसेनेला जमले नाही, कमीतकमी मुंबईमधील व्यवस्था टिकवायच्या कशा, याबद्दल तरी विचार करण्याची गरज आहे. असाही टोला जयंत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

  भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी लढत होते. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी निघालेली भाजपा आता मुंबई महापालिकेची वॉचमॅन झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे मन कोणत्या कारणामुळे बदलले आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. पण आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या भाषणाला कशाप्रकारे उत्तर द्यावे याबाबत शिवसेना आणि भाजपाचे आमदार बुचकळ्यात पडले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.