Advertisement

नारायण राणे पु्न्हा दिल्ली दरबारी


नारायण राणे पु्न्हा दिल्ली दरबारी
SHARES

नाराज काँग्रेस नेता नारायण राणे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत. याखेपेस राणे यांची दिल्लीवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी आहे. गेले काही दिवस नारायण राणे यांच्या संभाव्य काँग्रेसत्यागाच्या बातम्या राजकीय वर्तुळात चवीनं चघळल्या जात होत्या. राणे भाजपात जाणार की शिवसेनेत? यावर पैजाही लावताना दिसत होते. स्वतः नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र, माजी खासदार निलेश आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत याबाबतीतल्या चर्चेला रसद पुरवली. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राणे यांनी दिल्लीत भाजपाच्या ‘वजनदार’ नेत्याची भेट घेतल्याचं वृत्तही ‘मुंबई लाइव्ह’ ने दिलं होतं. 10 एप्रिल म्हणजे येत्या सोमवारी नारायण राणे यांचा 65वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राजकीय क्षेत्रातल्या नामवंतांच्या उपस्थितीत विशेष सोहळा रंगणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आमंत्रित करण्यासाठी नारायण राणे नवी दिल्ली मुक्कामी गेले असल्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अद्याप निमंत्रण दिलं गेलेलं नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. गंमत म्हणजे या कार्यक्रमाला भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित आहेत.

स्वपक्षाच्या नेत्यांना डावलून राणे भाजपा नेत्यांना आनंदसोहळ्यात सहभागी करुन घेत आहेत, असं मानायचं तर ते राहुल गांधी यांची भेट तरी सोहळ्याला उपस्थित रहावं, ही विनंती करण्यासाठी घेत आहेत की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांविरोधात पक्षत्यागापूर्वीची शेवटची तक्रार करण्यासाठी? हा नवा संभ्रम उभा राहिला आहे. येत्या 9 एप्रिलला संभ्रमावरचा पडदा वर सरकतो का? यावर भविष्यातल्या राजकीय घडामोडींचा अंदाज घेणं सोपं जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement