नारायण राणे, पुष्पहार आणि तिरंदाजी

 Mumbai
नारायण राणे, पुष्पहार आणि तिरंदाजी

मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना ज्येष्ठ काँग्रेस नेता नारायण राणे वाढदिवसाची भेट देण्याची शक्यता आहे. पक्षाच्यावतीने राणे यांना कमळ’पुष्प’गुच्छ भेट देण्यावर भाजपातल्या मोठ्या नेत्यांचं एकमत झालं आहे. राणे भेट स्वीकारणार की नाही? हा प्रश्न आहेच. 10 एप्रिलला नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला धनुष्यबाण घेऊन वाटेत येणाऱ्या अडचणींचा वेध घ्यायचा का? यावरसुद्धा राणे यांचं विचारमंथन सुरु आहे. सध्या कणकवली मुक्कामी असलेल्या नारायण राणे यांनी त्यांचे थोरले पुत्र माजी खासदार निलेश राणे यांना रत्नागिरीहून कणकवलीला पाचारण केलं आहे. धाकटे पुत्र आमदार नितेश राणेसुद्धा कणकवलीला पोहोचले आहेत. वाढदिवसाला राजकीय मैदानात जोरदार आतषबाजी करण्यासाठी राणे कुटुंबिय सज्ज झालेलं आहे.
कोकणातील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांशी भेटी-गाठी घेत पुढच्या राजकीय प्रवासाबद्दल त्यांच्या मताचा अदमास घेण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. कमळ पुष्प की धनुष्यबाण? या राणे यांच्या प्रश्नाला ‘धनुष्यबाण’ हे उत्तर उत्साहात देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या याक्षणी जास्त आहे. पण पुढच्या वाटचालीसाठी राणे यांना कार्यकर्त्यांच्या मतासोबत स्वतःचा राजकीय फायदाही विचारात घ्यायचा आहे. कमळपुष्प स्वीकारल्यास कोकणात कार्यकर्त्यांच्या कर्तबगारीच्या तलावातलं उत्साहाचं पाणी आटणार असलं तरी वैयक्तिक पातळीवर त्यांना मोठी प्रगती करता येणार आहे. तर धनुष्यबाण जवळ केल्यास कार्यकर्त्यांमध्ये कोकणातली लोकप्रियता निश्चितपणे वाढणार आहे.

राणे यांनी कमळपुष्पाची भेट स्वीकारली तर सध्या खिशाला भलंमोठं कमळपुष्प खोचून फिरणारे राजन तेली, काका कुडाळकर, संदेश पारकर ही कोकणातली नेतामंडळी खांद्यावर धनुष्यबाण घेतील आणि धनुष्यबाणाची प्रत्यंचा ताणायची, असा निर्णय राणे यांनी घेतला तर गेले काही महिने इकडून तिकडे उडी मारण्यासाठी निमित्त शोधणारे राज्याचे विद्यमान अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर आणि विधानसभा निवडणुकीत राणे यांना पराभवाची चव चाखायला लावणारे कुडाळचे आमदार वैभव नाईक कमळपुष्पाकडे झेपावतील. अर्थात राजकीयदृष्ट्या अशा अवघडलेल्या परिस्थितीतून बाहेर येण्याची तजवीज संबंधित करणार आहेत. आता कमळ हुंगायचं, धनुष्यबाण घेऊन सज्ज व्हायचं की समर्थकांना संयम राखण्याचं आवाहन करत हात दाखवायचा, हा निर्णय राणे यांना घ्यायचा आहे. राजकारणातला पूर्वानुभव लक्षात घेता अमलात आणलेल्या निर्णयाच्या भल्याबुऱ्या परिणामांचं दायित्वही अर्थातच त्यांना स्वीकारायचं आहे.

Loading Comments