अधिवेशनात राणेंचा दरारा

 Vidhan Bhavan
अधिवेशनात राणेंचा दरारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते पद नसतानाही मागील अधिवेशनात आपली छाप पाडली होती. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने विधानसभा गाजवलेल्या नारायण राणे यांचा विधान परिषदेमध्ये आजही दरारा कायम असल्याचा प्रत्यय विधान परिषदेमध्ये अंतिम आठवड्याच्या प्रस्तांवावरील चर्चेच्या वेळी आला. 

विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेत्यांना उत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपले एक मोठे राजकीय आयुष्य आहे. या राजकीय आयुष्यामध्ये असे बोलत असतानाच अचानक विरोधी बाकावर बसलेल्या नारायण राणे यांचा आवाज आला. त्यांनी विचारलं कोणाबद्दल बोलत आहात? नारायण राणे यांच्या या आवाजामुळे मुख्यमंत्री सावध झाले आणि त्यांनी आपली बाजू सावरत सांगितले की, तुमच्याबद्दल नाही बोलत विरोधी पक्ष नेत्यांबद्दल बोलत आहे. राणेसाहेब तुम्हाला अर्थसंकल्पाबाबत सांगण्याची आवश्यकता नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू पटकन सावरली. मात्र, यामुळे नारायण राणे यांचा आजही विधीमंडळामध्ये किती वचक आहे हे दिसून आले.  

विधान परिषदेमध्ये नारायण राणे यांनी भाषण केले होते, त्यानंतर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यांचा समाचार घेतला. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणामध्ये नारायण राणे यांच्या मुद्दयांविरोधात एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नारायण राणे यांच्या दांडग्या अभ्यासाबाबत नमूद केले.

युतीच्या काळात विरोधीपक्ष नेतेपदी असलेल्या नारायण राणे यांनी तेव्हाही सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत विधानसभेमध्ये आपली छाप पाडली होती. त्यामुळे राणे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा दरारा मात्र विधीमंडळात कायम राहणार हे नक्की.

Loading Comments