'धनंजया'वर 'नारायणा'स्त्र?

  Vidhan Bhavan
  'धनंजया'वर 'नारायणा'स्त्र?
  मुंबई  -  

  नरिमन पॉइंट - महाभारत युद्धात नारायणाच्या कृष्णावतारानं धनंजय म्हणजे अर्जुनाला साथ दिली होती. पण महाराष्ट्रातल्या सत्तेच्या महाभारतातला नारायण धनंजयाचा पत्ता कापण्याच्या तयारीत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची जागा काँग्रेसचे नारायण राणे घेण्याची शक्यता आहे. किंबहुना काँग्रेस मुंडेंकडील पदासाठी दावा करणार आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर सभागृहातलं काँग्रेसचं संख्याबळ वाढलंय तर काँग्रेस प्रभावहीन अवस्थेत आहे. सदस्यांमध्ये नवचैतन्य संचारावं आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करता यावी यासाठी नारायण राणे हा उत्तम पर्याय काँग्रेससमोर आहे. लढवय्या आणि अभ्यासू नेता असा लौकिक असलेल्या राणेंकडे विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याचाही दांडगा अनुभव आहे. पक्षांतर्गत विरोधकांनीही त्यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाकडे विधान परिषद विरोधी पक्षनेता म्हणून राणे यांचंच नाव पुढे करणार आहे. 5 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेतापदासाठी दावेदारी सादर करेल, अशी सूत्रांची माहिती आहे.

  काँग्रेसच्या गोटात या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरून चालणार नाही, हेसुद्धा काँग्रेसचे नेते जाणून आहेत. भूतकाळातल्या काही प्रसंगांचा हवाला देऊन राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावरचा हक्क सोडण्यास नकारही देऊ शकेल. या परिस्थितीत राणेंना स्वतःचं राजकीय कसब पणाला लावावं लागेल. याआधीही काँग्रेस गटनेतापदाच्या स्पर्धेत माणिकराव ठाकरेंसोबत राणेंचं नाव चर्चेत होतं. आता माणिकराव विधान परिषदेचे उपसभापती आहेत आणि राणे यांच्या नावाला अनुकूलही. साहजिकच पक्षांतर्गत अडथळ्यांची शर्यत जिंकलेल्या राणेंनी पुढची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.