Advertisement

राजकारण सोडून शेती केलेली बरी, ईडीच्या कारवाईमुळे अजित पवार अस्वस्थ!


राजकारण सोडून शेती केलेली बरी, ईडीच्या कारवाईमुळे अजित पवार अस्वस्थ!
SHARES

राज्य शिखर बँकेतील घोटाळ्यात माझं नाव आल्याने अस्वस्थ होऊन अजित पवार यांनी राजीनामा दिला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवली. एका बाजूला ईडीच्या कार्यालयात जाण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं असताना सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अजित पवार राजीनामा दिल्यानंतर नाॅट रिचेबल झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खुद्द शरद पवार यांनाही याची कल्पना नाही.

राजकारणाची पातळी घसरली

यासंदर्भात सायंकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, मला जेव्हा कळालं की अजित पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही. त्यानंतर मी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांनी सकाळी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली अस्वस्थता व्यक्त केली. सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींना मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं (शरद पवार) नाव आल्याने  अस्वस्थ झालोय.  गेली ५० ते ५२ वर्षे राजकारणात, समाजातील विविध संस्थांमध्ये अनेक मानाची पदं भूषवल्यानंतर त्यांची चौकशी लागली हे मला सहन होत नाही. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडून आता शेती-व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला त्यांनी पार्थ पवार यांना दिला.

कुटुंबप्रमुख म्हणून चर्चा करणार

त्याचसोबत मागील दोन दिवस आम्ही सोबतच होतो. शिखर बँकेत मी कुठल्याही पदावर नसताना देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ होते, ही गोष्ट मला जाणवत होती. पण ते राजीनामा देतील हे ठाऊक नव्हतं, तशी कुठलीही चर्चा त्यांनी आमच्याशी केली नाही.एखादी गोष्ट पटली नाही, तर ते थेट त्यावर व्यक्त होतात हा त्यांचा स्वभाव आहे. मात्र त्यांच्यावर अजूनही पक्षाच्या, राजकीय जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना भेटून राजीनामा देण्यामागचं कारण जाणून घेणार आहे. तसंच आमच्या कुटुंबात कुठलाही राजकीय वाद नसल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं.  



हेही वाचा-

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, ‘हे’ आहे का कारण?

ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा