Advertisement

आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...

सत्ता ही जास्तीत जास्त हातांमध्ये गेली पाहिजे आणि ती तशी जायला हवी असेल तर आरक्षणाचे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...
SHARES

सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकार कात्रीत सापडलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ता ही जास्तीत जास्त हातांमध्ये गेली पाहिजे आणि ती तशी जायला हवी असेल तर आरक्षणाचे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील, असं पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, 'मराठा आरक्षण असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागेचा गंभीर प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील. तुमची सत्ता ही अधिक हातांमध्ये गेली पाहिजे. सत्ता ही कॉन्संट्रेट झाली, केवळ एकाच ठिकाणी राहिली की ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. 

हेही वाचा- पुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी?, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे, ते कृतीत आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे सगळं आपण जितकं जोमानं करू, तितका राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांचा पाठिंबा मिळेल.

मी मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायती आणि पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जुन्या पिढीतील काही कार्यकर्त्यांनी माझ्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा निर्णय चुकीचा का आहे हे त्यांना सांगता आलं नाही. उलट, आरक्षणाच्या निर्णयामुळं गावं आधीपेक्षा जास्त एकत्र आलीत. पिढ्यान पिढ्या एकाच घरात असलेली सत्ता विखुरली गेली. याबद्दल अनेकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. असं काम आपल्याला अपेक्षित आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील उपेक्षित घटकांच्या केवळ पाठीशी उभा राहातो असं नाही तर त्यांच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्द करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो, या वर्गात नेतृत्वाची फळी तयार करतो, हे चित्र आपण निर्माण करणं आवश्यक आहे, असं शरद पवार म्हणाले.

(ncp chief sharad pawar clarifies his stance on maratha and obc reservation in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा