Advertisement

यापुढं लाॅकडाऊनवर निर्णय एकमतानेच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारक इथं भेट घेतली.

यापुढं लाॅकडाऊनवर निर्णय एकमतानेच!
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारक इथं भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला, तरी लाॅकडाऊनबाबतचा गोंधळ दूर करून तिन्ही पक्षांच्या संमतीनेच निर्णय घेण्यात यावा, यावर प्रामुख्याने (ncp chief sharad pawar meets maharashtra cm uddhav thackeray over lockdown relaxation) चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. त्यात गृहमंत्रालयही काही बाबतीत अंधारात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. सरकारमध्ये काही निर्णय परस्पर घेतले जातात. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, असं राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे. तसंच अर्थचक्राला गती देण्यासाठी लाॅकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करत उद्योगधंद्यांना चालना द्यावी, कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीवरील निर्बंध अटी-शर्थीनुसार हटवण्यात यावेत, अशी खुद्द पवार यांची अपेक्षा असताना मुंबईसहीत काही शहरांमध्ये घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे पवारही नाराज होते. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीत शरद पवार यांनी पुन्हा एकदा लाॅकडाऊन शिथिल करण्याबाबत सहमतीने निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या.

हेही वाचा - केवळ २ किमी परिघातच संचाराची अट रद्द

राज्यातील कोरोना संकटाचा आढावा घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. ' मिशन बिगिन अगेन 'च्या दुसऱ्या टप्प्यांत अनेक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार शासन आदेशही काढण्यात आला आहे. त्यानुसार आणखी मोकळेपणाने व्यवहार करता येतील, अशी अपेक्षा असताना दुसऱ्याच दिवशी घरापासून २ किलोमीटरच्या पुढे वाहन नेल्यास वाहन जप्तीच्या कारवाईला सुरूवात झाली.

त्यापाठोपाठ वसई-विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मिरा भाईंदर या महापालिकांच्या हद्दींसह अन्य भागांतही १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू आहे की पुन्हा लाॅकडाऊन असा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांच्या कारवाईने सरकारने लोकांची नाहक नाराजी ओढावून घेतली. प्रशासकीय अधिकारी मनमर्जीने निर्णय घेत असल्याबद्दल मंत्र्यांनीही नाराजी दर्शवली. 

दरम्यान, या भेटीनंतर मुंबई पोलिसांकडून घालण्यात आलेल्या २ किमी परिघातच प्रवास आणि इतर व्यवहाराचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. तरीही लोकांना नाहक घराबाहेर पडून गर्दी करू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा