Advertisement

सीमा वादावर ‘हेच’ शेवटचं हत्यार- शरद पवार

सीमाभागातील बांधवांनी अविरत संघर्ष करून हा लढा सुरू ठेवला आहे. तिथल्या अनेक पिढ्या या लढ्यात उद्ध्वस्त झाल्या, तरीही चळवळीला त्यांनी प्राधान्य दिलं, असं शरद पवार म्हणाले.

सीमा वादावर ‘हेच’ शेवटचं हत्यार- शरद पवार
SHARES

इतकी वर्षे एखादी चळवळ सतत शांततापूर्ण पद्धतीने सुरू असल्याचं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे एकमेव उदाहरण आहे. सीमाभागातील बांधवांनी अविरत संघर्ष करून हा लढा सुरू ठेवला आहे. तिथल्या अनेक पिढ्या या लढ्यात उद्ध्वस्त झाल्या, तरीही चळवळीला त्यांनी प्राधान्य दिलं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी सीमा भागातील बांधवांच्या लढ्याचं कौतुक केलं.

महाराष्ट्र शासनाचे सीमाप्रश्न विशेष कार्याधिकारी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद - संघर्ष व संकल्प’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी सीमावादाच्या लढ्यावर प्रकाश टाकला.

यावेळी ते म्हणाले, या लढ्यात अनेक टप्पे आले. एका टप्प्यावर निपाणी हा भाग महाराष्ट्राला देऊ केला होता. मात्र सीमाभागातील नागरिकांनी भूमिका घेतली की, सर्वच भाग एकत्रितपणे महाराष्ट्रात (maharashtra) सामील व्हावा. त्यामुळे निपाणी महाराष्ट्रात आले नाही. यातील सत्य मांडण्याचे काम बॅ. ए. आर. अंतुले यांनी केले. मला वाटतं या प्रश्नावर अंतुले यांचे मोठं काम होतं, त्याचा उल्लेख या पुस्तकात नाही.  

हेही वाचा- महाराष्ट्र-कर्नाटकातील वादग्रस्त सीमा भाग केंद्रशासित का करू नये- उद्धव ठाकरे

आजही सीमाभागातील नागरिक नोव्हेंबरमधील एक दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रातूनही अनेक भागातील लोक या आंदोलनाला पाठिंबा देत होते. राज्यात महाराष्ट्र एकीकरण समिती गठीत करण्यात आली. माझ्यासह एस. एम. जोशी, स्व. बाळासाहेब ठाकरे, प्रा. एन. डी. पाटील, छगन भुजबळ असे नेते या समितीत होते. समितीच्या वतीने मीदेखील सीमाभागात जाऊन आंदोलन केलं होतं.

आमच्या यातना या कदाचित काही दिवसांच्या असतील, पण सीमाभागातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून या यातना भोगत आहे. आम्हाला मराठी भागात जायचं, महाराष्ट्रात राहायचं आहे, या एका भूमिकेसाठी त्यांनी चळवळ धगधगत ठेवली आहे.

आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी त्यासाठी चांगली तयारी केली आहे. सुप्रीम कोर्ट हे आपलं शेवटचं हत्यार आहे. त्यामुळे तिथं आपल्याला चांगली तयारी करूनच जावं लागेल. आपल्याला उचित असा अनुकूल निर्णय कसा मिळेल, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.

विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर विषयांवर आमची मते भिन्न असली तरी सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने लोकांसमोर सीमाप्रश्नाचा हा इतिहास मांडला जातोय यासाठी मी डॉ. दीपक पवार यांना धन्यवाद देतो, असं शरद पवार म्हणाले.

(ncp chief sharad pawar reacts on maharashtra and karnataka border dispute)

हेही वाचा- तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा