Advertisement

पेट्रोलची शंभरी आणि दाढीवाला फलंदाज, राष्ट्रवादीची ठाण्यात होर्डिंगबाजी

राष्ट्रवादीनं मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा खोचक मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यात लावली आहेत.

पेट्रोलची शंभरी आणि दाढीवाला फलंदाज, राष्ट्रवादीची ठाण्यात होर्डिंगबाजी
SHARES

पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीनं मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा खोचक मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यात लावली आहेत.

मे महिन्यामध्ये सुमारे १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखे होर्डिंग्ज संपूर्ण ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे.

सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र आहे. त्यात शतक पूर्ण केल्याचं नमूद केलं आहे. “मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा खोचक मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे.

ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डिझेलच्या किंमतीत २९ पैसे प्रति लिटरनं वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात शुक्रवारी पेट्रोलचा भाव १००.४ रुपये आणि ९१.८७ रुपये प्रति लिटर आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हे फलक लावले आहेत.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध ठाणे शहरात होर्डिंग्ज लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यावर शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते “बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असं ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे, असं राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितलं.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा