Advertisement

सीबीआयच्या छाप्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कारवाई पूर्ण झाल्यावर सीबीआयचं पथक निघून गेलं. त्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या देशमुख यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

सीबीआयच्या छाप्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरासह, कार्यालयांमध्ये सीबीआयच्या पथकाने शनिवारी छापा टाकत झाडाझडती केली. सीबीआयच्या या छाप्या दरम्यान अनिल देशमुख यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्ह्याची नोंदही केली. यानंतर अनिल देशमुख यांना अटक होणार की नाही, यावर तर्कवितर्क लढवले जात असताना कारवाई पूर्ण झाल्यावर सीबीआयचं पथक निघून गेलं. त्यानंतर  माध्यमांसमोर आलेल्या देशमुख यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांबाबत ही चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करून देण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. सिंह यांनी आरोपांची सखोल चौकशी व्हावी याकरीता सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला १५ दिवसांच्या आत यावर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने दाखल केला एफआयआर

यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची ११ तास चौकशी केली होती. देशमुख यांच्यासोबतच त्यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील १० तास चौकशी केली होती. मात्र त्यानंतर शनिवारी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या १० मालमत्तावर छापेमारी केली. यामध्ये मुंबईतील सरकारी बंगल्यासाेबतच, नागपूरमधील निवासस्थान आणि खासगी तसंच पक्ष कार्यालयांचा समावेश आहे. 

या छाप्यादरम्यान सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांना ताब्यात देखील घेतलं होतं. त्यानंतर देशमुख यांच्यासह इतर चार अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने गुन्ह्याची नोंद केली. गुन्ह्याची नोंद झाल्यावर अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यानंतर सीबीआयचं पथक निघून गेलं.

त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आल्यावर अनिल देशमुख यांना याबाबत विचारणा केली असता, सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड इथं नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे, अशी मोजक्या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

या छापेमारीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

(ncp leader anil deshmukh reaction after CBI raid)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा