Advertisement

राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. त्यांना हे ठाऊक असलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.

राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर…
SHARES

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.

१२ आमदारांचा प्रश्न निकाली काढा

याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले की, राज्यपाल महाेदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अवगत केलं आहे की, आपण विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी. निश्चितरूपाने आम्ही ही निवडणूक घेऊ. पण १२ आमदारांचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित असल्याने हा विषय लवकर निकाली काढावा, अशी आम्ही त्यांना विनंती करतो.

त्याचसोबत विधिमंडळाचं अधिवेशन एक आठवड्यासाठी घ्या, अशी देखील सूचना त्यांची आहे. ते देखील आधी मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना माहीत आहे की बिझनेस अॅडव्हायझरी समिती हिच विधिमंडळाच्या कामकाजाबाबत निर्णय घेते, सरकार घेत नाही. 

आणि तिसरा विषय म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. त्यांना हे ठाऊक असलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याच्या निर्णयामुळे नाही.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊच, आधी ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती झाली तर बरं- नवाब मलिक

राजकीय उद्देशाने

आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही. एकंदरीतच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आलेलं आहे.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी २३ जून रोजी आपल्या शिष्टमंडळासह राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानमंडळाचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्याबाबत, विधानसभा अध्यक्षांचं संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत उपरोक्त तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याने याबाबत आपण यथोचित कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावं, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून म्हटलं आहे. 

(ncp leader nawab malik slams governor bhagat singh koshyari on obc reservation in maharashtra)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा