Advertisement

पाकिस्तानच्या साखरेवर राष्ट्रवादीची धाड

केंद्र सरकारने पाकिस्तानी साखर आयात केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला होता की ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं जाळू. आणि त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दहिसर मोरी येथील गोदामामधील साखरेच्या गोण्या फोडण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या साखरेवर राष्ट्रवादीची धाड
SHARES

सुरक्षा आणि दहशतवाद या कारणावरून भारताचे पाकिस्तानविरोधात वाद सुरू असताना आता आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो मेट्रिक टन साखर पडून असताना केंद्र सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने दहिसरच्या मोरी गावातल्या गोदामातील साखरेच्या गोण्या फोडत आंदोलन केलं आहे.


मग खरेदी का?

राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे. अशातच साखरेचे दर कोसळत आहे. असं असतानादेखील केंद्र सरकारने पाकिस्तानी साखर आयात केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला होता की ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं जाळू. आणि त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दहिसर मोरी येथील गोदामामधील साखरेच्या गोण्या फोडण्यात आल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते देखील हजर होते.

'भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचं नवं धोरण भाजप सरकारने आखलं आहे. पण त्यांचं हे धोरण यशस्वी होऊ देणार नाही, पाकची साखर भारतात विकू देणार नाही', असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.


पाकिस्तानी साखर 1 रुपयाने कमी

मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो मेट्रिक टन साखर आहे. तरीही केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. ही साखर येथील बाजार भावापेक्षा 1 रुपयाने कमी किमतीची आहे. 2017 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात होणार असल्याची माहिती सभागृहात आव्हाडांनी दिली होती.


'पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा कट'

एकीकडे पाकिस्तानच्या नावाने बोंब ठोकायची आणि त्यांच्याच अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी पाकिस्तानी साखर आयात केली आहे, म्हणजेच आपली अर्थव्यवस्था मेली तरी चालेल ही दुटप्पी भूमिका या सरकारने आखली आहे. त्यांचं हे बेगडी राजकारण समोर येत आहे. यापूर्वी पाकिस्तानी कांदा भारतात आणून आपल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना देशोधडीला लावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

भाजपा सरकारचा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट आम्ही हाणून पाडू. ही पाकिस्तानी साखर आम्ही बाजारात विकू देणार नाही. आता ऊसाच्या चिपाडानेच यांना बडवले पाहिजे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान साखरेच्या या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा